दिवस क्र. १० दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

 १ एप्रिल २०२० 

मला एकांत आवडतो. पण अशा अविच्छिन संपूर्ण एकटेपणाची सवय नाही. आणि इथं मी अपुरा पडतो. सध्या आज तारीख कोणती आणि वार कोणता हे पटकन सांगता येत नाही. जवळच्या किराणा मालाच्या दुकानांना दिलेल्या एका भेटीव्यतिरिक्त गेल्या दहा दिवसात मी बाहेर पडलेलो नाही. शासनाचा आदेश आहे ‘घराबाहेर पडू नका.’ हे बाहेर न पडणे खूप अंतर्मुख करून टाकतंय. पण शिवाय ते तारेच्या आत सापडलेल्या पाखरांसारखं अस्वस्थ उद्विग्न करून टाकतंय. असं वाटतंय पंख ल्यावेत व उडावं. बाहेर पडावं कुंपणाच्या आणि भटकावं. घरच्या आत खाण्यापिण्याच्या गोष्टींचा तुटवडा नाही किंबहुना आमच्या अनावश्यक गतिशील व त्याहून अनावश्यक अशा व्यस्त जीवनात कधी एकदा निवांतपणा मिळेल असा विचार नेहमी करतो. आज मात्र या निवांतपणाला तोंड देताना नाकी नऊ येत आहेत. मला हा दुबळेपणा वाटतो. आम्हीच तयार केलेल्या काहीशा अप्रिय पण अपरिहार्य जीवनशैलीतून उद्भवलेला. 

उंच उडावे तर पंख नाहीत चालावे तर पाय बांधलेत. टीव्ही असो व सेलफोन सगळीकडे रुग्ण, आजार, उपाय, मास्क, व्हेंटिलेटर, मृत्यू, ओसाड रस्ते आणि संभाव्य उपचार. वातावरणातील नकारात्मकता जीव घुसमटून टाकणारी आहे. पण रस्त्यावर पडलेल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो मजुरांची जी दुःखद अवस्था आहे, खाण्याचे राहण्याचे त्यांचे जे हाल आहेत त्या मानाने माझ्या हे एकटेपणाचे दुःख ही सुद्धा एक चैन आहे. कोविद १९ च्या निमित्ताने आमच्या देशातील सामाजिक आर्थिक विषमतेचे एक अतिभयानक चित्र नजरेसमोर आले आहे. जमावबंदी आणि कुलूपबंदीत देशातील बेघर आणि निर्वासित झालेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. काही लोक शेकडो किमी चालून आपल्या गावी व घरी जाण्याचा प्रयत्न करताहेत. काही तात्पुरत्या निवासगृहात तुटपुंज्या सोयीनिशी कोंडले गेले आहेत. राज्यांच्या सीमेवरती आयाबहिणी पोरंबाळं धरतीलाच अंथरूण-पांघरूण मानून प्रतिक्षेच्या कुंपणात कोंडली गेली आहेत. कोरोनाचा विषाणू भयानक आहेच पण लोकशाही असूनही आपण तयार केलेला विषमतेचा भस्मासुर या देशाच्या मूल्यांवरती फार मोठा डाग आहे. त्या पार्श्वभूमीवर माझे एकटेपण हे एक भाबडे वांझ दुःख आहे.

दिवस क्र. ९ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

३१ मार्च २०२० 

जग थबकलंय. पण मन ही थबकलंय. रेल्वे, विमान, मालवाहू ट्रक, बसेस या सर्वांबरोबर कोणत्याही विषयावर दूरगामी विचार करण्याची किंवा नियोजन करण्याची मनःस्थिती नाही. वास्तविक हा टप्पा तात्पुरता आहे आणि याला शेवट आहे हे माहित असूनही असे का वाटते समजत नाही. 

न्यू जर्सीहून किशोर गोरे या मित्राने लिहिले आहे, “खरं सांगायचं तर आमच्या आजूबाजूची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आमच्या घराच्या आसपास पाच-दहा कि.मीच्या परिसरात जवळजवळ पन्नास कोरोना रुग्ण आहेत. न्यूयॉर्क इथून अवघ्या ५० किमी वर आहे जिथं जवळजवळ २५००० जणांना लागण झाली आहे. देशातील ५०% हून अधिक रुग्ण न्यूयॉर्क न्यूजर्सी कनेक्टिकट या तीन राज्यातील असून फक्त आज ५०० लोकांचा मृत्यू झाला. तीन आठवड्यापासून आम्ही घरात बंदिस्त आहोत. आणि आमच्या दोन्ही मुलींना भेटू शकलेलो नाही. अंकिताचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेय पण तिचा पदवीदान समारंभ रद्द झालाय. ती १ जुलै पासून रेसिडन्सी सुरु करणार होती पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती अशा रुग्णांच्या सेवेसाठी लगेच रुजू होण्याचे नियोजन करते आहे.”

अशाच प्रकारचे गंभीर चित्र ऑस्ट्रेलियातील छोट्या फिनिक्स मधून आलेल्या पत्रात प्रतिबिंबित आहे. त्या पोस्टमधली काही वाक्यं, ‘सध्या क्लिनिकमध्ये बाहेरचा आजार आत येऊ नये म्हणून शक्यतो रुग्णाला बाहेरच्या बाहेर निपटवणं चालू आहे. हॉस्पिटलमध्येहीकोणाला घेत नाहीत. अगदीच परिस्थिती बिघडली आणि व्हेंटिलेटर लागणार असेल तरच ऍडमिट करून घेताहेत.” (सौजन्य: आर्याबाग ग्रुप/मंगेश सपकाळ)

मी आणि पत्नी साधनाने आज ठरवले की एक तास कोरोना सोडून इतर विषयांवर बोलू. पाचच मिनिटात आम्हाला नकळत आम्ही पुन्हा कोरोनावर आलो. कुणीतरी गळ्याभोवती कोरोनाचा फास बांधतोय. मग दुसरा विषय कसा सुचणार? बाहेर आत टीव्ही वर व्हॉटसऍप वर फक्त हा ‘व्हायरस’ आहे. आज दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘तबलिग’ संस्थेच्या बेपर्वाईमुळे उद्भवलेल्या रुग्णांबाबत दाहिदिशानी चर्चा सुरु आहे.  

दिवस क्र. ८ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

३० मार्च २०२०

सामाजिक कार्य

गावी नियमित फोन करणे सुरु आहे. भाऊ, वाहिनी आणि आई आणि आता सुटीवर आलेली शालेय वयातील पुतणीची मुलगी आर्या. आर्या पुण्याला शिकते. कोरोना व्हायरस च्या संदर्भात गावातील अंगणवाडी व आशा कर्मचारी घरोघरी जाऊन बाहेरून कोण आले आहे? त्यांची तब्बेत कशी आहे या गोष्टींची पडताळणी करत आहेत. आर्याची पण चौकशी झाली आणि तिच्या हातावर १४ दिवसांचा विलगीकरणाचा ठप्पा हातावर मारला गेला. 

नामू दादा म्हणाला, ‘कोबीची भाजी काढायला आली आहे पण जमावबंदीमुळे काढणे शक्य नाही. नुकसान अटळ आहे.’ यावर्षी शेतकऱ्यांना पूर व अवकाळी यांचा तडाखा बसलाच होता. आता कोविदचा झटका बसतोय. 

स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतत आहेत. त्यातल्या एका जमावावर रसायन युक्त निर्जंतुकचा फवारा करण्यात आला. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना आपले स्थान न सोडण्याचा आणि त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्यसरकारांना दिल्या आहेत. या दरम्यान, हजारो कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा,राजस्थान व बिहार या राज्यांनी बसेस ची व्यवस्था केलेली आहे.  दरम्यान अनेक गावांबाहेर स्थानिकांनी रस्ता बंदी केली आहे. बाहेरचे कुणी येता कामा नये मग ते गावकरी का असेनात असा पवित्रा आहे. 

 मी जी दोन गावे दत्तक घेतलीत. त्यापैकी एक आहे शिरोळ तालुक्यातील बस्तवाड. स्थानिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंगारे यांनी एक वेगळाच उपक्रम घेतला.गावकऱ्यांची भाजी थेट कोल्हापुरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवली. आमच्या फौंडेशनने या कठीण काळात चांगले काम सुरु केले आहे. 

 अशीच चांगल्या कामाची बेटं सगळीकडेच तयार होताहेत. विनायक माळी व त्याची पत्नी सार्शा ऊसतोड कामगारांना मदत करत आहेत. पुण्यात मित्र राज देशमुख यांचा जागृती ग्रुप निराधार मजुरांच्या कुटुंबांना धान्याचा पुरवठा करतोय. ही बेटं मला या काळात आशावादी ठेवताहेत. 

दिवस क्र. ७ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

२९ मार्च २०२०

लोधी उद्यान दिल्ली

काल माझ्या शाळेच्या संस्कृत शिक्षिका मीरा करकरे (सहस्त्रबुद्धे) यांच्याशी बोललो. तब्बेतीची चौकशी. इतर काही गप्पा. कोरोनाच्या निमित्ताने एक नवा संवाद होतोय सर्वांशी. नंतर बाईंचा छोटासा संदेश आला. ‘आज तू आवर्जून चौकशी केलीस आमची, काळजी केली, सूचना ही केल्यास खूप छान वाटलं. केवढा आधारभूत होतो असा दिलासा.’ बाई आणि त्यांचे पती कोल्हापूरला अपार्टमेंटमध्ये राहतात. कुणाची मदत नाही पण ते स्वतःची काळजी घेत आहेत.  कोल्हापुरच्या सायबर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी यांचा मोरोक्कोच्या विमानतळावरील लाउंज मधून फोन आला होता. कुठल्याशा देशाला कामासाठी जाऊन परत येताना मोरोक्को – दुबई मार्गे मुंबई हा प्रवास व त्याचा बोर्डिंग पास ही त्यांच्या हातात होता. दुर्दैवानं मोरोक्कोला येऊन ते लॉकडाऊन मध्ये अडकलेत. विमानतळावरून बाहेर जात येत नाही. त्यांना मधुमेह आहे. दूतावासाची मदत होत आहे. पण त्यांची अवस्था कैद्यासारखीच आहे . 

सक्तीच्या या सुट्टी मुळे अनेक बारीक गोष्टींकडे लक्ष जातंय.  आमच्या अंगणात फुललेले आणि फुलू पाहणारे प्रत्येक फूल मला ओळखते. आंब्याचा मोहर पावसामुळे गळतोय. चाफ्याला अचानक पानं फुटून थंडीत कोरडा ठणठणीत वाटणारा चाफा संवेदनशील वाटतोय. लिंबाच्या छोट्या पिवळ्याशार पानांचा दररोज एक नवा गालिचा तयार होतोय. सूर्यास्ताच्या वेळेस लिंबाच्या झाडाचे दररोज नवे विलोभनीय रूप दिसतंय. कधी नव्हे तितके रात्रीचे आकाश नितळ असल्याने पहिल्यांदा ग्रह व तारे दिसताहेत. पक्ष्यांचे आवाज नेहमी पेक्षा अधिक स्पष्ट ऐकू येताहेत. लोदी उद्यानातील बदकांचा कलकलाट दिवसभर ऐकू येतोय. संध्याकाळी परिसरातील मोरांचं साद प्रतिसाद नाट्य कानावर पडतं. दरम्यान माझ्या पुढाकाराने आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार पंतप्रधानांच्या कोरोना निधीला देण्याचा ठराव केला. ही आपली खारीची मदत. काहीतरी केल्याचे समाधान. अल्प का असेना. नाहीतरी मेलो की गेलोच ना. 

दिवस क्र. ६ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

२8 मार्च २०२०


कुठेही जात येत नाही. काल मुष्किलीने खान मार्केट पर्यंत गेलो. आणि काही घरच्या अत्यावश्यक गोष्टींची खरेदी केली. पोलीस ध्वनिक्षेपकापातून या महामारीतून बचाव करण्यासाठी काय काय उपाय करायचे हे सांगत होते. 

इकडे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर आणि बस स्थानकांवरती हजारोंच्या संख्येने लोक धक्काबुक्की करताहेत. त्यांच्या हातात डोक्यावर सामान आहे. बायका पोरांना घेऊन त्यातले असंख्य लोक पायी उत्तर प्रदेश बिहार व मध्य प्रदेश वगैरे राज्यांकडे जायला निघालेत. या दरम्यान दिल्ली प्रशासनाने व अन्य राज्यांच्या प्रशासनाने बसेस पाठवून या लोकांना आपापल्या  जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठीची व्यवस्था सुरु केली आहे. लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्थाही शाळा व सामाजिक संस्थांच्या जागा वापरून करण्यात येत आहे. शांततेच्या काळात प्रशासनावर अशा प्रकारे अभूतपूर्व तणाव आलेला आहे. युद्धातील तणाव हे मुख्यतः सीमेच्या आसपास असतात. आता देशाचा इंच इंच देशवासियांनी लढवायची सीमा झाली आहे. 

माझ्या समोरच्या खिडकीतून  लोदी गार्डन स्पष्ट दिसते. तिथले कारंजे सुरूच आहे. झाडं वाऱ्यांनी झुलताहेत. स्वच्छ सुंदर ऊन आणि आम्हाला अपरिचित आश्चर्यकारक अशी प्रदूषणरहीत हवा. सुंदर ऊन पण बाहेर पाऊल टाकणे नाही. दररोज संध्याकाळी एकदा घराचे कुंपण ओलांडून दोन मिनिटांसाठी मुख्य रस्त्यापर्यंत जातो. तिथं जणू आपोआप एक अदृश्य कुंपण असल्याचा भास होऊन आम्ही घरी परततो, प्रत्यक्षात एक सुंदर निर्जन दुतर्फा भरगच्च हिरव्या पानांचा शालू लेऊन डोलणाऱ्या अशोकाच्या उंच झाडांनी शोभिवंत असा रस्ता आहे. पण अशा या संकटाच्या वेळी नसलेल्या लक्ष्मणरेखा दिसू लागतात. ‘भय इथले संपत नाही’ असेच काहीसे. 

दररोज एखादी विदेशात अडकलेल्या भारतीयांची नवीनच कथा ऐकायला मिळते. काल अभिजित बोरा मॉरिशस वरून बोलत होते. त्यांना तिथून चार्टर विमान मिळालेले आहे. त्यांना भारतात येण्यासाठी आवश्यक परवानगी हवी आहे. माझ्या परीने मी पूर्ण मार्गदर्शन केले.   

दिवस क्र. ५ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

मार्च २०२०

थोडा फार वेळ मिळतो आहे. शहर शांत आहे. रस्ते शांत आहेत. झाडांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, घरात येणारा सूर्यप्रकाश प्रत्येकाला एक व्यक्तिमत्व आहे. 

आज माझ्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना आयुष्यातला पहिला फोन केला. पंधरा मिनिटे गप्पा मारल्या. ज्योतिराव साळुंखे हे नेहमी अधिकारवाणीचेच बोलतात. शिवाय जेंव्हा तेंव्हा काही ना काही सूचना जरूर करतात. आजही त्यांनी संधी सोडली नाही, ‘ तू हे मानवाधिकार वगैरे सोड आणि एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू हो’ मी ही हो म्हणालो. ‘एक पिढी घडवता येते’ यावर आमचीही एकवाक्यता झाली. 

नंतर मी जी. टी. महाजन या माझ्या आवडत्या शिक्षकांबरोबर बोललो. जी. टी नी सतत माझ्यावर प्रम केले. बंगालीतल्या शरदचंद्रापासून नित्शेपर्यंत सगळ्या बाहेरच्या लेखकांची नावं त्यांच्याकडून आयुष्यात पहिल्यांदा ऐकली. आजही संवादात ते असंच उत्साहाने बोलत राहिले. शेवटी म्हणाले ‘तुझ्यासारखं पोर जेंव्हा बोलतं, तेंव्हा माझ्यासारख्याची जगायची जिद्द दुप्पट होते’ महाजन सर म्हणजे दुसरे ग्रेस आहेत. 

आज अनेक गोष्टी घडल्या. महत्वाची म्हणजे यु.के.चे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन हे कोरोना पॉजिटीव्ह निघाले.  काही दिवसांपूर्वी अनेक कोरोना रुग्णांच्या बरोबर हस्तांदोलन केले. त्याचा हा परिणाम. एक कृती आणि परिणाम संपूर्ण ब्रिटनला भोगावे लागताहेत. यातच कहर म्हणून की काय यु.के.च्या आरोग्य मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झालीय. संपूर्ण ब्रिटन अत्यंत स्फोटक टप्प्यातून जातो आहे. 

आपल्याकडे स्थलांतर करणाऱ्या श्रमिकांचे प्रचंड हाल होताहेत. शेकडो कि.मी. चालत निघलेत हे लोक. बस नाही, रेल्वे नाही, टेम्पो नाही मात्र सर्वत्र नाकेबंदी आहे. जातीय दंगल असो, गोळीबार असो किंवा कुलूपबंदी सगळ्यात हाल गरिबांचेच. 

दिवस क्र. ४ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

२६ मार्च २०२०

आता संपूर्ण शहरच नव्हे तर संपूर्ण देशच एवढंच काय संपूर्ण जग थबकल्याचा भास होतोय. घरासमोरच्या बागेत एकही व्यक्ती फिरताना भटकताना दिसत नाही. रस्त्यावरती वाहन अतिशय तुरळक. एका अर्थाने जग केवढं शांत व वारंवार प्रसन्न दिसतंय. दिल्लीत वसंताला सुरुवात झाली आहे. वातावरणात अजूनही एक हलका का असेना गारवा आहे. 

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व बंद आहे. आधी राज्याच्या सीमा बंद. मग जिल्ह्याच्या बंद. आता तर गावोगावच्या सीमांवर नाकेबंदी सुरु आहे. अनेक गावांमध्ये मागच्या काही आठवड्यात गावात बाहेरून आलेल्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इतरांनी त्यांचा संपर्क करू नये त्याचप्रमाणे त्या व्यक्तीनी स्वतःचे विलगीकरण करावे हा या पाठीमागचा हेतू आहे. 

काल केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. तिथंही सगळ्या खुर्च्या अंतर ठेऊन लावल्या होत्या. साहजिक आहे. प्रिन्स ऑफ वेल्स, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष, कमलनाथ, यांच्या वार्ताहर परिषदेतील पत्रकार, कॅनडाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी या सर्वाना संसर्ग झाला आहे आणि जर्मनीच्या एंजेला मर्केल पासून इंग्लंडच्या राणीपर्यंत सर्वानी विलगीकरण स्वीकारले आहे. याचा अर्थ हा संसर्ग कोणालाही सहज होऊ शकतो. फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याना होण्याची शक्यता कमी आहे. ‘कोरोनापेक्षा मंदीमुळे अधिक लोक मारतील’ त्यामुळे त्यांनी २ ट्रिलियन डॉलरच्या अर्थसहाय्याची योजना अर्थव्यवस्थेसाठी बनवलीय. त्यांना अर्थव्यवस्थेचा ‘विषाणू’ लागलेला असल्याने कोरोना होण्याची शक्यता कमी आहे. 

‘सामाजिक अंतर’ वाढवण्यावर सध्या जोर असला तरी सामाजिक माध्यमांवर प्रतिभा माहिती, कल्पनाविलास व भयतंत्र या सर्वांचाच विस्फोट झाला आहे. स्पेनमधले गल्लोगल्ली जाऊन जनतेचे मनोरंजन करू पाहणारे पोलीस, मुखवटे घालून गुढी उभारणारे मराठी दाम्पत्य, थाळी वाजवताना लोकांनी केलेले प्रताप असो सगळेच अद्भुत आहे. एका खेडूत बाईची कोरोनाला शिव्या देतानाची क्लिपिंगही मजेदार.   

दिवस क्र. ३ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

२५ मार्च २०२०सगळे बंद. तुरळक वाहतूक. घरी पैसे नाहीत. गाडी काढली. ऑफिसात गेलो. त्या आधी ड्रायव्हर ला घरी यायला सांगितले. तो नानक पुरातून बस घेणार. मग कार्यालयाच्या पार्किंगमधून गाडी घेऊन येणार. मग मी बँकेत जाणार. मी त्याला पुन्हा फोन करून येऊ नको म्हणून सांगितलं. मी स्वतःच गेलो माझी गाडी घेऊन. ऑफिसातून चेकबुक घेतले. बँकेतून पैसे काढले. परतीच्या प्रवासात दोन ठिकाणी पोलिसांनी अडवले. मी माझे ओळखपत्र दाखवले. ‘ऑफिसला गेलो होतो घरी परत चाललोय’ असं सांगितलं. ‘कौनसा ऑफिस?’ वगैरे चौकशी करून त्याने मला सोडून दिले. 

संध्याकाळी पंतप्रधानांनी भाषण दिलं राष्ट्राला उद्देशून. पहिल्यांदा मनापासून व मुद्देसूद बोलले. आवाजातला नाटकीपणा नैसर्गिक वाटला. कृत्रिम नव्हे. २१ दिवसांची संचारबंदी घोषित. अन्य देशांमध्ये काय चाललंय, विशेषज्ञ काय म्हणतात, २२ तारखेची संचारबंदी यशस्वी झाली व आता तीन आठवडे बंद पाळल्याने काय चाललंय सगळं छान मांडलं त्यांनी. आवश्यक कडक उपाय योजना किती आवश्यक आहे हे सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत सांगितले. 

मी ही घरातच आहे. काही गोष्टी नव्याने सुरु केल्या. लेखनातील नियमितता वाढवली. बागेतच चालणे सुरु ठेवले. म्हणजे आमच्या अंगणात. संध्याकाळी ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ ही अमेरिकेतील मालिका पाहायला सुरुवात केली. तीन भाग पाहिले. सत्ता माणसाला किती निर्दय उद्दाम बनवते आणि लोकशाहीत महत्वाकांक्षी लोक वर येण्यासाठी काय करू शकतात या बरोबरच व्यक्तिगत जीवन किती वेगळे होते त्याचे ताणतणावही इथं या मालिकेत दिसतात. या प्रक्रियेत दुर्बलाला चिरडणे हा नैसर्गिक व अनुषंगिक परिणाम. पण खेद दुःख किंवा चिंता नाही.  उलट शोकांकिकांचे भांडवल करण्याची कला ही अवगत असावी लागते सत्तापिपासू लोकांना.   

दिवस क्र. २ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

२४ मार्च २०२०

माती पंख आकाश


वाहतूक थोडीफार सुरूच आहे. बागेतही एखादी व्यक्ती फिरताना दिसत आहे. जनतेने गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. 

आमचा माळी पवन, शेजारच्या सरकारी वसाहतीतील एका जिन्या खाली राहतो. अतिशय कर्तव्य दक्ष, मेहनती, शिस्तप्रिय, शांत व सोज्वळ. झाडांवर बागेवर फुलांवर प्रेम करणारा विशीतला पवन. कोरोनाच्या विस्तारामुळे आम्हाला त्याची काळजी वाटतेय. प्रत्येकाने दोन आठवडे घरी राहून विलगीकरण करावे हा संदेश प्रधानमंत्री मुख्यमंत्री व सक्षम अधिकाऱ्यांनी दिला आहे. आमच्या बागेत आठवड्यातील सहा दिवस तो दोन – तीन तास काम करतो. कोरोनामुळे आम्हाला वाटत होते की त्याने आता रोज येऊ नये. आज मी त्याला एका महिन्याचा अतिरिक्त पगार दिला व म्हणालो ‘पवन हे तुझ्या खर्चासाठी. आता तू सहा दिवस येण्याऐवजी आठवड्यातून फक्त एकदा येत जा. फार फार तर दोनदा? पावनने पैसे घेतले – माझ्याकडे बघून निरागसपणे म्हणाला, ‘मी जवळच राहतो. मला दररोज येण्यात काहीच अडचण नाही! मी त्याच्या या प्रस्तावाला नकार दिला पण तो आग्रही होता. शेवटी तडजोड म्हणून म्हणाला ‘मी एका दिवसाआड येत जाईन.’ आम्हाला ते मान्य करावे लागले. तो बागेत काम करायला गेला. 

मी विचार करत होतो पवन कशासाठी कामावर येऊ इच्छितो. आता तर १४४ कलम दिल्लीत जाहीर झाले आहे. जिन्याखाली तो आणि त्याचे वडील राहतात. तिथे जागा कमी आहे म्हणून?  की दुसरे काहीच करायला नाही म्हणून? बागेचे त्याला प्रेम तर आहेच पण त्यापलीकडे एक माणूस म्हणून पवन चोवीस कॅरेटचे सोने आहे. अल्पशा पगारात गरिबीत राहून अशा या साथीच्या रोगाच्या काळात पवन  हे माणुसकीचे विलोभनीय उदाहरण आहे.

दिवस क्र. १ दैनंदिनी (संचारबंदी) श्री ज्ञानेश्वर मुळे

२३ मार्च २०२०

दिल्ली मध्ये संचार बंदी मुले ओस पडलेला रास्ता.


पंतप्रधानांच्या विनंतीनुरूप भारतात पहिल्यांदाच ‘जनता संचारबंदी’ चा दिवस. एका अर्थाने कोरोना व आपल्या युद्धा चा पहिला औपचारिक दिवस. आजुबाजूला सर्वत्र शांतता. सकाळपासून रात्री नऊ पर्यंत सर्वांनी घराच्या आत नजर कैदेत. एरवी काही बंद व काही चक्का जाम ची चित्रे अनुभवली आहेत पण अशा प्रकारची स्वेच्छा नजरबंदी पहिल्यांदाच अनुभवतोय. 

सकाळी थोडा उशिराच उठलो. वेळेवर उठण्याचे बंधन संपले अशी आपोआप स्वयंसूचना झालेली होती.  मग बागेत म्हणजे आमच्या कुंपणा आतल्या बागेत नेहमीप्रमाणे इअरप्लग लावून यू ट्यूब वरील ‘प्राचीन रोम मधील महत्वाच्या स्त्रिया’ या विषयावरचे व्याख्यान ऐकले.  रोमन नावं लक्षात राहत नाहीत ही वस्तुस्तिथी आहे. ऐकत होतो तरी मन कोरोना विषाणू व त्याच्या परिणामाचा विचार करत होते. 

दिवसभर एका अर्थाने जगापासून दूर झालो होतो. पण एका अर्थाने मिंटामिनटाला फोन उघडून नवीन घटना नवीन सरकारी सूचना याची माहिती वाचत होतो. भारताच्या अनेक भागात अंशतः किंव्हा पूर्ण संचारबंदी लागू केलीय.  दिल्लीतही सोमवारी सकाळ ६ पासून सर्व गोष्टी बंद केल्याची घोषणा मुख्य मंत्र्यांनी केली आहे. विमान वाहतुकीसह मेट्रो बसेस कार्यालये बंद राहतील. फक्त अत्याधुनिक सेवा सुरु राहतील. 

संध्याकाळी ५ वा. वातावरणात अचानक उत्साह संचारलेला दिसला.  लोक टाळ्या वाजवून किंव्हा ताटे वाजवून कोरोना ग्रस्त लोकांना आरोग्य व अन्य सेवा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत होते. मीही एक थाळी व चमचा घेऊन कृतज्ञेच्या उत्सवात शामिल झालो. संध्याकाळी मुंबई आणि दिल्लीतील कृतज्ञता सोहळ्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स पहिल्या. दिल्लीत संयमपूर्वक कृतज्ञता साजरी केली होती तर मुंबईत शेकडोच्या संख्येने जनात मोटोरसायकली घेऊन व गर्दी एकत्र करून कृतज्ञता साजरी करतेय. म्हणजे या  संपूर्ण संचारबंदी उद्देशांवरतीच विरजण टाकल्यासारखे आहे. मेरा भारत महान.