दिवस क्र. १९ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
१० एप्रिल २०२०
काही बातम्या आपल्याला आनंद देतात की दुःख हे कळत नाही. हेच बघा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीचे कोरोनाच्या आर्थिक क्षेत्रातील परिणामामुळे एक-तृतीयांश अवमूल्यन झाले असून आज घडीला त्यांची संपत्ती ३.१ बिलीयन डॉलर्स ऐवजी २.१ बिलियन डॉलर झाली आहे. मार्च १ पासून मार्च १८ पर्यंत केवळ जेमतेम दोन आठवड्यात हा परिणाम झाला आहे.
कोरोना चे जगाच्या वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळे परिणाम होत आहेत. चीनने कुत्र्यांचे वर्गीकरण ‘पशू’ ऐवजी ‘निष्ठावान पाळीव प्राणी’ असे केले आहे. फेब्रुवारीमध्ये चीनने कोणत्याही प्रकारच्या वन्यप्राण्यांच्या खाद्य म्हणून वापरावर बंदी घातली होती. चीनमधल्या मधल्या वुहान मधल्या जिवंत प्राणी बाजारातून करण्याची सुरुवात झाली असे सुरुवातीच्या रुग्णांवरून लक्षात आले होते. याबाबत चीनवर प्रचंड टीकाही झाली होती. चीनमध्ये वर्षाला एक कोटी कुत्री आणि ४० लाख मांजरांची कत्तल होते खाण्यासाठी. आता कुत्री वाचतील अशी आशा निर्माण झाली आहे
न्यूयॉर्कमधूनही धक्कादायक बातमी आली आहे. शहराच्या हार्ट बेटावर असणार्या दफनभूमीत मोठाले खड्डे खणण्यात आले असून त्याचा करुणा मुळे मृत झालेल्या रुग्णांसाठी सामूहिक दफनभूमी म्हणून वापर करण्यात येत आहे. ज्या मृत व्यक्तींच्या देहा वर कोणीच हक्क सांगत नाही अशा मृतदेहांचे इथे दफन होते. साधारणतः इथं आठवड्याला २५ मृतदेह यायचे आता कोरोना काळात ही संख्या दररोज २४ अशी आहे. हे मृतदेह अशा पद्धतीने शवपेटीत दफन केले जात आहेत की पुढेमागे नातेवाईकांना हवे असेल तर तो देह त्यांना हस्तांतरित करता येईल. कोरोनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन दुषित असण्याचे कारण एकदा हॉस्पिटलमध्ये गेलेल्या रुग्णाला भेटण्याची परवानगी कुणालाच नसते. आणि मृतदेह पूर्णपणे निर्जंतुक प्लास्टिकच्या पोत्यात टाकुन त्याची विल्हेवाट लावावी लागते. साताऱ्यात अशा एका कोरोना ग्रस्त मृत व्यक्तीच्या दहन संस्काराची व्हिडीओ क्लिप पाहिली. दहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही प्रचंड काळजी घ्यावी लागते.
कोरोनाचे आकडे जाहीर करण्याच्या बाबतीत आपला व अमेरिकेचा दृष्टिकोन दोन समाजांमधला फरक स्पष्ट करतो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोना च्या प्रभावाने दोन-अडीच लाख लोक अमेरिकेत मरण्याची शक्यता आहे असे घोषित केले. ते हे ही सांगायला विसरले नाहीत की मृतांची संख्या या संख्येवर रोखणे याचा अर्थ अमेरिकेने (पर्यायाने मी) खूप चांगले काम केले आहे असा होतो. याउलट भारतात अजूनही ‘कोरोना चे सामूहिक संक्रमण अजून होत नाही’ असे सांगण्याकडे कल आहे. आपल्या रुग्णांची व मृतांची संख्या कमी आहे असे सांगताना किंवा ऐकताना आपल्याला चांगले वाटते त्यामुळे खरी संख्या आपण सांगत नाही असे अनेकांचे मत आहे. अमेरिकेची पारदर्शकता टोकाची आहे तर आपली अपारदर्शकता? काही असो आज ना उद्या खरे आकडे बाहेर येतीलच.
Leave a Reply