दिवस क्र. १८ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

९ एप्रिल २०२०

उद्योजक किरण शॉ मजुमदार यांचा भारतातल्या निवडक स्पष्टोक्त उद्योजकांपैकी सर्वात अग्रक्रम आहे. त्यांनी भारतातील कोरोना केसेस जितक्या जाहीर झाल्यात त्यापेक्षा चार पट असाव्यात असे वक्तव्य केले आहे. याशिवाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘खाजगी कंपन्यांनी सुद्धा कोरोना चाचण्या मोफत कराव्यात आणि शासनाने त्याचे पैसे द्यावेत’ या निर्णयावर तो अयोग्य असल्याची टीका केली आहे.

न्युझीलँड ची ही घटना प्रशासन संकट काळात कसे चालवावे याचे उत्तम उदाहरण आहे. तिथल्या आरोग्य मंत्र्याची पदावनती केली आहे. डॉक्टर डेव्हिड कुर्क या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः लॉकडाऊनच्या निर्बंधांचा भंग करून वीस किलोमीटर दूर असलेल्या समुद्रकिनाऱ्याला कुटुंबीयांसमवेत भेट दिली. त्यापूर्वी एकदा आपल्या बाईक वरून दोन किलोमीटर जाऊन त्यांनी नियमभंग केला होता. मात्र त्यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली व स्वतःला मूर्ख म्हणून संबोधले. पण प्रधानमंत्री आरर्डेन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही पण त्यांची पदावनती केली. त्यांच्याकडून मंत्रालय काढून घेतले. त्यांनी कोविदचे संकट टळल्यानंतर ‘आरोग्यमंत्र्यांना किंमत द्यावी लागेल’ असेही जाहीर केले.

कोविद ने सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे हे मात्र खरे. जगभर १५ लाखांवर रुग्ण घोषित. भारतात ही संख्या सहा हजार पाचशेच्या आसपास आहे. शंभरपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियाच्या शाही कुटुंबातील 150 जणांना विलगीकरण आत ठेवण्यात आले आहे. दिल्लीत आणि नोएडात दहापेक्षा अधिक हॉटस्पॉट जाहीर करून त्या भागांची संपूर्ण नाकेबंदी करण्यात आली आहे. आमच्यापासून केवळ तीन किमीवर निजामुद्दीन हा हॉटस्पॉट आहे.

सध्या एप्रिल १४ नंतर कुलूप बंदीची मुदत वाढ होणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. ओडिशाने ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढ केली आहे. संक्रमणाचा विस्तार पाहता केंद्र सरकारही देशव्यापी मुदतवाढ जाहीर करण्याची शक्यता आहे. या दरम्यान ऑलिम्पिक सहीत अनेक आंतरराष्ट्रीय व आंतर्देशीय सामने रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान झूम द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करण्यावर जोर वाढला आहे. काल मी झूम वर विद्यार्थ्यांची संवाद साधला. शिवाय चांगुलपणाच्या थाळीवरही चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *