दिवस क्र. १७ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

८ एप्रिल २०२०

बाळासाहेब माळी. वय साधारण ५५-६० वर्षे. गाव हेरवाड. तालुका शिरोळ जि.कोल्हापूर. नुकतेच त्यांनी लावलेली दीड एकर मधील सिमला मिरचीचे पीक हातात आले. पण हातात आले कुठे? कोरोना मुळे आलेल्या लॉकडाऊन मुळे त्यांचे हातात आलेले पीक गेले. काही महिन्यांपूर्वी महापूर. आता कोरोना. त्यांचा आक्रोश स्थानिक टी. व्ही. च्या स्क्रीन वरती मावत नव्हता. ‘उसाच्या पिकाला अठरा महिने लागतात म्हणून पिकात बदल केला. चारेक लाख खर्च केले. कष्ट घेतले. पीक उत्तम आले पण काय उपयोग. पीक काढायला माणसं नाहीत. बाजारात घेऊन जाता येत नाही. लोक येऊन घेऊन जाऊ शकत नाहीत. शासन खरेदी करत नाही. फुकट वाटू शकत नाही. ८-१० लाखाचे नुकसान झाले.’ शेवटी त्यांनी दीड एकराच्या संपूर्ण  पिकावर नांगर फिरवला व ते नष्ट केले. शेतकऱ्यांची शोकांतिका कोविद-१९च्या चर्चेत सगळ्यात शेवटी येते हे दुर्दैव आहे. उद्योगाच्या पुनर्वसनाएवढेच शेतीच्या भविष्याविषयी नियोजन केले नाही तर बाजारातील भाव कडाडल्याशिवाय राहणार नाहीत. आजही शेतीमाल थेट शेतातून ग्राहकांच्या घरी यावा यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये जनता खाणं-पिणं थांबवत नसेल तर शेतकऱ्याला त्रास न होता त्याचं पीक, भाजीपाला, दूध यांची खरेदी सुलभ करण्याला प्राथमिकता द्यायला नको का?

या पार्श्वभूवर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात रामायणाचा संदर्भ देत, ‘ज्याप्रमाणे रामाचा बंधू लक्ष्मण याचा प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालयातून औषधी बुटी आणली, ख्रिस्ताने आजारी लोकांना बरे केले आणि अंधांना दृष्टी दिली त्याप्रमाणे भारत आणि ब्राझील एकत्र येतील, वैश्विक संकटावर मात करतील’. राष्ट्राध्यक्ष बॉलसो नारो यांनी भारताच्या औषधांचा पुरवठा चालू ठेवावा अशी विनंती पंतप्रधानांना केली. संकटाच्याकाळी मदत करण्याची क्षमता भारताकडे आहे ही फार चांगली गोष्ट आहे. 

दरम्यान अमिताभ बच्चनचा एक लघुपट व्हायरल झाला आहे. चित्रपटात अमिताभ आपला गॉगल शोधताहेत या धाग्यावर कथा बेतलेली आहे. प्रियांका चोप्रापासून रजनीकांत, रणवीर कपूर, आलिया भट, दक्षिणेकडचे अनेक नामवंत कलाकार आहेत. शेवटी गॉगल सापडतो. पण या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाही कलाकाराने चित्रीकरणासाठी आपले घर सोडले नाही. कोविद-१९ च्या सावलीत घरात थांबूनही सर्जनशील व क्रियाशील राहता येते हाच संदेश या चित्रपटातून अप्रत्यक्षरित्या दाखवला गेला आहे. आपले घर म्हणजे सीमा न होता एक नवे क्षितिज होऊ शकते – निर्मितीचे अंगण!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *