दिवस क्र. १६ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

७ एप्रिल २०२०

‘लॉकडाऊन संपल्यानंतर लोक विभक्त होतील, घटस्फोटाचे अर्ज वाढतील आणि गरोदर महिलांची संख्या वाढेल’ असं एका इटालियन लेखिकेनं ‘तुमच्या भविष्यातून’ लिहिलेल्या पत्रात म्हंटलं आहे. तिच्या भविष्यावरच्या भाष्यात तिनं लॉकडाऊन नंतर जग एका नव्या वस्तुस्थितीला सामोरं जाणार आहे असं म्हंटलं आहे. मला मात्र वाटतं की, आर्थिक क्षेत्रातील काही अपरिहार्य परिणामांचा सामना सोडला तर जग पुन्हा आपल्या वळणावर जाईल. तितकंच महत्वाकांक्षी, तितकंच चंगळवादी, तितकंच गतिशील आणि स्वार्थी होणार आहे जितकं ते लॉकडाऊनच्या आधी होतं. 

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोरोना उगम आणि प्रसारातील चीनच्या भूमिकेविषयी व जबाबदारीविषयीची चर्चा नकारात्मक दिशेने जाण्याची शक्यता ५०:५० टक्के आहे. सध्या जगाची चीनविषयक स्थिती ही ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी आहे. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटनेवर तीर सोडून पहिली खेळी केलेली आहे. त्यांच्या मते संघटनेने ‘चीनकेंद्रित भूमिका घेतली व अमेरिकेला चुकीचा सल्ला दिला. सुदैवाने अमेरिकेने तो सल्ला ऐकला नाही आणि चीनकडून येणारी विमानवाहतूक थांबवली. लॉकडाऊन नंतर या गोष्टींची पडताळणी केली जाईल.’ 

सध्याचं जग हे किती परावलंबी आहे त्याचं आणखी एक उदाहरण. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनावर उपाय मानलं गेलेलं हैड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाची मागणीवजा धमकी या औषधाचा जगातील सगळ्यात मोठ्या उत्पादक असलेल्या भारताला केली. ‘जर अमेरिकेला हे औषध निर्यात करण्यास बंदी घातली तर अमेरिका कारवाई करेल.’ अशी ही धमकी. भारताने आपले काही दिवसांपूर्वी लादलेले निर्यात निर्बंध रद्द केले. अमेरिकेला हे औषध पाठवले जाईल. गम्मत म्हणजे या औषधासाठी लागणारी जी औषधी द्रव्ये असतात ती भारत चीनमधून आयात करतो. आहे ना परस्परावलंबन. आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो फक्त आपल्या देशाचे हितसंबंध महत्वाचे असतात.’ 

या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील भिलवाडा या शहराने कोरोना संक्रमणाला थोपवण्यात मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इथल्या २७ रुग्णांपैकी २० बरे झाले आहेत. रुग्ण असल्याचे कळताच राजस्थान सरकारने १६००० आरोग्य कर्मचारी पाठवले. कठोर सोशल डिस्टंसिंग, मोठ्या प्रमाणात चाचण्या, शहराची पूर्ण नाकेबंदी व यंत्रणेतील यशस्वी समन्वय हे या यशाचे गमक दिसते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *