दिवस क्र. १५ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
६ एप्रिल २०२०
काल ‘दिया जलाओ’ कार्यक्रम पार पडला. त्यावर आज अनेक प्रकारची टिप्पणी सोशल मीडियात पाहायला मिळाली. पण सर्वात महत्वाची कमेंट कोरोना व्हायरस कडून आली. ‘दोस्तो समझमे नाही आ राहा है की मै व्हायरस हूँ या त्योहार’ सामान्य माणसाची विनोदबुद्धी सामान्य नसते हेच खरे.
अतुल गोतसुर्वे भारताचे उत्तर कोरियामधले राजदूत. कोरोना व्हायरस संबंधी मी त्याच्याशी चर्चा केली. त्याला मी काही प्रश्न विचारले. त्याने दिलेल्या माहितीचा हा सारांश. ‘किम जोंग हा हुशार माणूस आहे. १ फेब्रुवारीपासून त्याने सर्व विमान वाहतूक थांबवली. १३ जानेवारीपासून चीनला गेलेल्या सर्वांचे विलगीकरण केले. आणि प्रत्येकाला मास्क सक्तीचा केला. सर्व विदेशी पर्यटक व नागरिक याना डिप्लोमॅटिक कुंपणाच्या आतच थांबण्याची सक्ती केली. १ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत दूतावासातील स्थानिक कर्मचाऱ्यांनाही दूतावासातच थांबवले. प्रत्येक दुकान आणि मॉलच्या प्रवेशावर सॅनिटायझरची व्यवस्था व सक्तीचा वापर.’ त्याच्या मते भारतात प्रत्येकाने घरी बनवलेला मास्क वापरावा व सध्याच्या परिस्थितीत मास्क व औषधे यांची निर्यात करावी. उत्तर कोरियात आत्तापर्यंत एकही कोरोना पीडित रुग्ण नाही.
सरकारची व राज्य प्रशासनाची कसोटी इथून पुढे लागणार आहे. पण खरा विचार करायचा तर ही कसोटी आपल्या आरोग्य व्यवस्थेची, प्रशासकीय गुणवत्तेची आणि सामाजिक एकजुटीची परीक्षा आहे. आपण ७० वर्षात लोकशाही बरोबरच अर्थव्यवस्था, शासकीय संस्था, निर्णय प्रक्रिया या कशा प्रकारे विकसित केल्या आहेत त्याची ही सत्वपरीक्षा आहे. कोरोना संकटात सर्वात खालचा बिंदू भारतात अजून आलेला नाही. शिवाय ही लढाई किती काळ टिकेल आणि एकंदरीतच देशावरच (नव्हे तर जगावरसुद्धा) याचा किती विपरीत परिणाम होईल याची या क्षणी कुणालाच कल्पना नाही. ना भारताला ना अमेरिकेला. एक देश आणि समाज म्हणून आपण केलेल्या कार्याची अग्निपरीक्षा यानंतरच होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान ,मंत्रीमंडळ व खासदारांच्या पगारात ३०% कपात आणि खासदार विकास निधी दोन वर्षे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे राष्ट्रपती , उपराष्ट्रपती व राज्यपालानी स्वागत करत स्वतःचा पगारही स्वेच्छेने ३०% कमी घ्यायचे ठरवले आहे.भाजपच्या अध्यक्षांनी भाजप कार्यकर्त्यांना एकवेळ भोजन करावे असे आवाहन केले आहे. ‘गो कोरोना गो’ ची रामदास आठवलेंची दुसरी क्लिप व्हॉटस अप विद्यापीठात फिरते आहे. बघूया काय काय वाढून ठेवले आहे ते!
Leave a Reply