दिवस क्र. १४ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
५ एप्रिल २०२०
सध्या कोविदशी संबंधित सुविचारांची, संदेशांचे, सूचनांचे पीक आले आहे. एका व्हॉटस अप विचारवंताने ‘मंदिरं आणि मद्यगृहे दोन्ही बंद झाले आहेत. याचा अर्थ स्वर्ग व नरक दोघेही कोरोनाला घाबरतात.’ असं या विचित्र समयाचे वर्णन केले आहे.बालाजीच्या मंदिराला पहिल्यांदा टाळे लागलेले आहे. दुसरीकडं मद्यपी मंडळी आपल्या पेय हक्कासाठी आवाज उठवताहेत. केरळ सरकारने अशा मद्यप्रेमींसाठी ‘विशेष पास’ देण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. गंमत म्हणजे केरळात आतापर्यंत कोरोनाच्या संक्रमणापेक्षा मद्याच्या अभावाने निराश होऊन आत्महत्या केलेल्या मद्यप्रेमींची संख्या अधिक म्हणजे सहा आहे.
न्यूयॉर्क स्थित माझे मित्र रवी बात्रा हे ही कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्याबरोबर पत्नी , मुलगा व कन्या यानाही कोरोनाने ग्रासले आहे.माझ्या मित्रांपैकी ते पहिले ज्यांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यांनी न्यूयॉर्कस्थित चीनच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांना उद्देशून एक कडक ट्विट लिहिले. त्यावर राजदूतांनी खेद व्यक्त केला. एकंदरीतच या प्रकरणात चीनच्या भूमिकेबाबत जगभर असंतोष पसरला आहे. अमेरिकेत चीनविरुद्ध नुकसानभरपाईसाठी २० ट्रिलियन डॉलरची केस दाखल करण्यात आली आहे. आज एका व्हिडीओ क्लिप मध्ये एक ऑस्ट्रेलियन तिथल्या चिनी दूतावासासमोर चाबूक घेऊन त्याचे फटके (जमिनीवर )मारत चीनला शिव्या देताना पहिला. भारतामध्येही अतिउत्साही जनतेने चीनच्या मालाविरुद्ध बहिष्कार टाकण्यासाठी व्हाट्सऍप चळवळ सुरु केली आहे. असे बुडबुडे वारंवार येतात. दुसरीकडे बातमी आलीय की भारत चीनमधून व्हेंटिलेटर आयात कारणार. आहे ना गंमत आणि विरोधाभास?
रवी बात्रांच्या पाठोपाठ आज लोकपालच्या एका सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची खबर आहे. कोरोना आधी फक्त चीन पुरता असेल असे वाटत होते. कळायच्या आधी तो युरोपभर पसरला. मग अमेरिकेत. तो पर्यंत आमच्यापर्यंत येईल असं वाटलं नव्हतं. आता इथंही ओळखीच्या लोकांपैकी काहींना झाला आहे. आपल्या महाराष्ट्र्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. दिल्लीतही ५००च्या वर रुग्ण. जगभर १२ लाख.
आमच्या मुलीने सांगितले कि इ-पार्टी नावाचे ॲप आहे. त्यावर तुम्ही जिथे असाल तिथून पार्टीत सामील होऊ शकता. तंत्रज्ञानाचा असाही वापर दिल बहलाने के लिए.
नऊ वाजले. प्रधानमंत्र्यांचा ९ वा ९ मिनिटे ‘दिया जलाईये’चा जल्लोष दिल्लीत सुरु झालाय. फटाके उडताहेत. शंखनिनाद होतोय. सावधान! कोरोना विषाणू सावधान! ज्योतसे ज्योत जलाते चलो.
Leave a Reply