दिवस क्र. १३ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
४ एप्रिल २०२०
कोविद दैनंदिनी दिवस क्र. १३
कुलूपबंदी. याचा अर्थ ‘घाई नाही.’ सकाळी उठायची घाई नाही. आंघोळीची घाई नाही. नाष्ट्याची घाई नाही. पुस्तक वाचायची घाई नाही. कामाला जाण्याची घाई नाही. जेवणाची घाई नाही. झोपून उठण्याची घाई नाही. रात्री झोपण्याची घाई नाही.
पंतप्रधानांनी ५ तारखेला रात्री ९ वा. ९ मिनिटे ‘दिवे लावण्या’चा जो सल्ला दिला आहे. त्या सल्ल्याने देशाला खरंच संपूर्ण देशाला चर्चेसाठी नवीन खाद्य मिळालं आहे. व्हॉट्सऍप पासून फेसबुक पर्यंतचे सगळे ओढे नाले नद्या मुख्यतः विरोधी सुराच्या पुराने भरभरून वाहताहेत. अनेकांना शटडाऊन मध्ये काय करावे हा प्रश्न होता तो दोन दिवसांसाठी सुटला. भक्तांनी ती वेळ कशी शास्त्रशुद्ध आहे इथपासून ‘कामदा एकादशी’चा (मी हे नाव पहिल्यांदा ऐकतोय) मुहूर्त त्यांनी कसा साधला आहे असा युक्तिवाद ज्योतिषशास्त्राचा ‘आधार’ घेऊन सांगितलाय. या उलट काही तथाकथित तज्ञांनी अशा प्रकारे एकदम वीजप्रवाह बंद झाला तर वीजव्यवस्थेवर ग्रीड कोसळण्यापासून ते विद्युतकेंद्रे कशी अडचणीत येतील इथपर्यंत अनेक आडाखे दिले आहेत. पण महत्वाचे म्हणजे अनेकांनी प्रधानमंत्र्यांनी स्थलांतरित मजूर, उद्योगधंद्यांवरील विपरीत परिणाम, पुरवठा साखळीत येणाऱ्या अडचणी व अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या दुरावस्थेबद्दल अजिबात न बोलता कुठल्यातरी अशास्त्रीय व अनावश्यक विषयावर वेळ घालवल्याबद्दल दुःख खंत व संताप व्यक्त केला आहे.
पण दोन सकारात्मक बातम्यांनी माझे मन वेधून घेतले. केरळमध्ये ९२ वर्षीय पती आणि ८४ वर्षाच्या पत्नी अशा जोडप्याने कोरोना संक्रमणावर मात केली आहे. दुसरी अजूनही उत्साहवर्धक बातमी म्हणजे सध्याच्या या शटडाऊनमुळे हवा अगदी स्फटिकासारखी स्वच्छ झाली आहे. याचा परिणाम म्हणून जालंदरहून २०० कि.मी. पेक्षा दूर असलेल्या हिमालयाची रांग शहरातून स्पष्ट दिसू लागली आहे.
याहूनही अधिक ‘प्रेममय’ वार्ता डेन्मार्क व जर्मनी यांच्या सीमेवरून आली आहे. जर्मनी आणि डेन्मार्कची सरहद्द सध्या बंद आहे. इंगा राझमुसेन (८५ वर्षे) आणि तिचा मित्र कार्स्टन हॅन्सन (८८ वर्षे) या जोडप्याचे प्रेम दररोज सीमेवर बहरते. इंगा स्वीडनची आणि कार्स्टन जर्मनीचा. तिथे ते गप्पा मारतात, एकत्र (सीमेच्या आपल्या बाजूला बसून) जेवण करतात, फ्लास्कमधली कॉफी आणि जील कोम (Geele Kom) हे तिथले लोकप्रिय मद्य पीत ‘चिअर्स टू लव’ म्हणून प्याल्यांचा आवाज करतात. प्रेमाला कोणतेही बंधन, सरहद्द किंवा लॉकडाऊन अमान्य आहे हेच सिद्ध करतात.
Leave a Reply