दिवस क्र. १२ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
३ एप्रिल २०२०
कोविदसारखी आपत्ती जेव्हा येते तेव्हा समाजातले सर्वोत्कृष्ट व समाजातले सगळ्यात निकृष्ट दोहोंचे दर्शन होते. आयुष्य बहुआयामी असते आणि सतत आपल्या सूक्ष्म आणि विशाल घटनांमधून स्वतःच्या तपशिलांचे दर्शन घडवते.
एका बाजूला गरिबांना आणि भिकाऱ्यांना जेवण व अन्नधान्य देणारे पोलीस दिसले. दुसरीकडे जमावबंदी तोडणाऱ्यांना पोलीस ‘निर्दय’पणे चोपताना दिसले. तिसरीकडे इंदूरमध्ये व अन्यत्र पोलिसांना बदडून काढणारे लोक दिसले. एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून योग्य अशा संरक्षक कवचाशिवाय काम करणारे स्वास्थ्य कर्मचारी डॉक्टर व नर्सेस दिसले. दुसरीकडे डॉक्टरांना पळवून लावणारे लोकही दिसले. एकीकडे विदेशात फसलेल्या भारतीयांना खास विमाने पाठवून भारताने मायदेशी आणले हे चित्र तर दुसरीकडे विलगीकरणाचा सल्ला न जुमानता विमानतळावरून थेट घरी जाऊन दोन दिवसांनी तपासणीसाठी जाणारा आय एस अधिकाऱ्याचा कोलकात्यातील मुलगा. एकीकडे स्थलांतरित मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी केलेली हजारो बसेसची उपलब्धता दुसरीकडे राज्यांच्या सीमेवर शेकडोच्या संख्येने रोखून ठेवले गेलेले मजूर. धारावीत जशी रोगाची लागण तशी नोएडातील उच्चवर्गीय वसाहतीतही. ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून भारतातील गायिका कनिका कपूर पर्यंत या विषाणूचा प्रवास संपूर्ण जगाला अवाक करून टाकणारा आहे.
तबलिगी मर्कज मुळे व्हाट्सऍप विद्यापीठात द्वेषपूर्ण पोस्टना ऊत आला आहे. याबाबत जिथे अंधश्रद्धा, अज्ञान, वैज्ञानिक शिक्षणाचा अभाव त्या ठिकाणी धर्म कोणताही असो अशा घटना घडतात. या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनाला जाऊ पाहणाऱ्या कर्नाटकातील एका महिलेचा बंद दरवाजापलीकडच्या पुजाऱ्याबरोबरचा संवाद हा एका व्हिडिओत पाहिला तो लक्षणीय होता. ‘मुसलमान नमाज पढताहेत. मलाही देवाचे दर्शन घेऊ द्या’ असे ती विनवणी पूर्वक म्हणते तेव्हा तो पुजारी उत्तरतो, ‘राजा हाच ईश्वर असतो. शासनाने आदेश दिला. तोच राजा. मंदीर उघडणार नाही.’ ती स्त्री तिथून निघून जाते. अनुशासनाचा हा नमुना सर्वच संस्थांनी आणि व्यक्तींनी पाळणे आवश्यक आहे. हे युद्ध मानवनिर्मित आहे असे म्हणायला जागा आहे पण अंततः हे युद्ध मनुष्य विरुद्ध निसर्ग म्हणून परमेश्वर यांच्यामधले आहे. यातून आपण काही धडा घेणार आहोत का हा प्रश्न आहे.
Leave a Reply