दिवस क्र. ११ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
2 एप्रिल २०२०
पत्नी साधना आणि कन्या पूजा यांच्याबरोबर मला इतका काळ एकत्र राहण्याची संधी पहिल्यांदाच मिळते आहे. सकाळी नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण यांच्याबरोबरच त्यांच्या आधीचा नंतरचा सगळं वेळ आम्ही एकत्र घालवतो. हे पारिवारिक संमेलन आणि सहवाससुख ही कोरोनाची सर्वात सुंदर देणगी आहे.
अर्थातच चारी बाजूनी भिडणाऱ्या कोरोना संदर्भातील घटना निरर्थकपणे मनाला भिडतात. २००० च्या वर रुग्ण, सामूहिक संक्रमणाची भीती. ६० च्या वर मृत्यू, अनेक डॉक्टरांना लागण, तबलिगी मर्कजमधून देशभर वितरित झालेल्या भाविकांच्या मार्फत होणारा संभाव्य विषाणू प्रसार सगळेच अस्वस्थ करणारे आहे.
घाणात अडकलेल्या मित्राच्या वतीने केलेल्या निवेदनावर मी सुद्धा स्वाक्षरी केली. पती घाणात अडकलेला, पत्नी व मुलांना मुंबईत कोरोना, एक मुलगी अपंग घरी आहे. तिला पाहणारं कुणी नाही. अशा प्रकारच्या गुंतागुंतीची अनेक उदाहरणे.
इतरांप्रमाणे मलाही कोरोनाच्या चक्रव्युहातून बाहेर पडावेसे वाटते. पण मला कोरोनापूर्वीचे जग मान्य नाही. मुख्य म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी सामंजस्य असलेलं आर्थिक, सामाजिक, प्रगतीचं एक नवीन मॉडेल उभारणं आवश्यक आहे. नैसर्गिक साधनांचं अनियंत्रित शोषण, ५ टक्के लोकांच्या हाती केन्द्रित झालेली आर्थिक सत्ता, फक्त राष्ट्रीय विकास दर (जिडीपी) आणि दर डोई उत्पन्नात झालेली वाढ यांच्या पायावर उभारलेली आमच्या प्रगतीची इमारत आतून पूर्ण पोखरलेली आहे. एका बाजूला प्राण्याच्या, माशांच्या, पक्ष्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होत आहेत दुसरीकडे आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विषमता आ वासून आमच्याकडे पाहतेय. कोरोनाच्या पश्चात एक नवीन सुरुवात करण्याची संधी संपूर्ण जगाला मिळतेय. कुणी सांगावं कोरोनाच्या प्रादुर्भावामागे निसर्गाचा हाच संदेश असेल. आजकाल माझ्या घरासमोरच्या लोदी गार्डन मधून दिवस रात्र बदकांचा आवाज येतोय, त्यांचा सामूहिक आवाज विहिरीतून पाणी काढताना मोटेचा आवाज व्हायचा तसा आहे. किती वर्षानंतर मोटेची आठवण आली.
Leave a Reply