दिवस क्र. १० दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
१ एप्रिल २०२०
मला एकांत आवडतो. पण अशा अविच्छिन संपूर्ण एकटेपणाची सवय नाही. आणि इथं मी अपुरा पडतो. सध्या आज तारीख कोणती आणि वार कोणता हे पटकन सांगता येत नाही. जवळच्या किराणा मालाच्या दुकानांना दिलेल्या एका भेटीव्यतिरिक्त गेल्या दहा दिवसात मी बाहेर पडलेलो नाही. शासनाचा आदेश आहे ‘घराबाहेर पडू नका.’ हे बाहेर न पडणे खूप अंतर्मुख करून टाकतंय. पण शिवाय ते तारेच्या आत सापडलेल्या पाखरांसारखं अस्वस्थ उद्विग्न करून टाकतंय. असं वाटतंय पंख ल्यावेत व उडावं. बाहेर पडावं कुंपणाच्या आणि भटकावं. घरच्या आत खाण्यापिण्याच्या गोष्टींचा तुटवडा नाही किंबहुना आमच्या अनावश्यक गतिशील व त्याहून अनावश्यक अशा व्यस्त जीवनात कधी एकदा निवांतपणा मिळेल असा विचार नेहमी करतो. आज मात्र या निवांतपणाला तोंड देताना नाकी नऊ येत आहेत. मला हा दुबळेपणा वाटतो. आम्हीच तयार केलेल्या काहीशा अप्रिय पण अपरिहार्य जीवनशैलीतून उद्भवलेला.
उंच उडावे तर पंख नाहीत चालावे तर पाय बांधलेत. टीव्ही असो व सेलफोन सगळीकडे रुग्ण, आजार, उपाय, मास्क, व्हेंटिलेटर, मृत्यू, ओसाड रस्ते आणि संभाव्य उपचार. वातावरणातील नकारात्मकता जीव घुसमटून टाकणारी आहे. पण रस्त्यावर पडलेल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो मजुरांची जी दुःखद अवस्था आहे, खाण्याचे राहण्याचे त्यांचे जे हाल आहेत त्या मानाने माझ्या हे एकटेपणाचे दुःख ही सुद्धा एक चैन आहे. कोविद १९ च्या निमित्ताने आमच्या देशातील सामाजिक आर्थिक विषमतेचे एक अतिभयानक चित्र नजरेसमोर आले आहे. जमावबंदी आणि कुलूपबंदीत देशातील बेघर आणि निर्वासित झालेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. काही लोक शेकडो किमी चालून आपल्या गावी व घरी जाण्याचा प्रयत्न करताहेत. काही तात्पुरत्या निवासगृहात तुटपुंज्या सोयीनिशी कोंडले गेले आहेत. राज्यांच्या सीमेवरती आयाबहिणी पोरंबाळं धरतीलाच अंथरूण-पांघरूण मानून प्रतिक्षेच्या कुंपणात कोंडली गेली आहेत. कोरोनाचा विषाणू भयानक आहेच पण लोकशाही असूनही आपण तयार केलेला विषमतेचा भस्मासुर या देशाच्या मूल्यांवरती फार मोठा डाग आहे. त्या पार्श्वभूमीवर माझे एकटेपण हे एक भाबडे वांझ दुःख आहे.
Leave a Reply