दिवस क्र. ७ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

२९ मार्च २०२०

लोधी उद्यान दिल्ली

काल माझ्या शाळेच्या संस्कृत शिक्षिका मीरा करकरे (सहस्त्रबुद्धे) यांच्याशी बोललो. तब्बेतीची चौकशी. इतर काही गप्पा. कोरोनाच्या निमित्ताने एक नवा संवाद होतोय सर्वांशी. नंतर बाईंचा छोटासा संदेश आला. ‘आज तू आवर्जून चौकशी केलीस आमची, काळजी केली, सूचना ही केल्यास खूप छान वाटलं. केवढा आधारभूत होतो असा दिलासा.’ बाई आणि त्यांचे पती कोल्हापूरला अपार्टमेंटमध्ये राहतात. कुणाची मदत नाही पण ते स्वतःची काळजी घेत आहेत.  कोल्हापुरच्या सायबर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी यांचा मोरोक्कोच्या विमानतळावरील लाउंज मधून फोन आला होता. कुठल्याशा देशाला कामासाठी जाऊन परत येताना मोरोक्को – दुबई मार्गे मुंबई हा प्रवास व त्याचा बोर्डिंग पास ही त्यांच्या हातात होता. दुर्दैवानं मोरोक्कोला येऊन ते लॉकडाऊन मध्ये अडकलेत. विमानतळावरून बाहेर जात येत नाही. त्यांना मधुमेह आहे. दूतावासाची मदत होत आहे. पण त्यांची अवस्था कैद्यासारखीच आहे . 

सक्तीच्या या सुट्टी मुळे अनेक बारीक गोष्टींकडे लक्ष जातंय.  आमच्या अंगणात फुललेले आणि फुलू पाहणारे प्रत्येक फूल मला ओळखते. आंब्याचा मोहर पावसामुळे गळतोय. चाफ्याला अचानक पानं फुटून थंडीत कोरडा ठणठणीत वाटणारा चाफा संवेदनशील वाटतोय. लिंबाच्या छोट्या पिवळ्याशार पानांचा दररोज एक नवा गालिचा तयार होतोय. सूर्यास्ताच्या वेळेस लिंबाच्या झाडाचे दररोज नवे विलोभनीय रूप दिसतंय. कधी नव्हे तितके रात्रीचे आकाश नितळ असल्याने पहिल्यांदा ग्रह व तारे दिसताहेत. पक्ष्यांचे आवाज नेहमी पेक्षा अधिक स्पष्ट ऐकू येताहेत. लोदी उद्यानातील बदकांचा कलकलाट दिवसभर ऐकू येतोय. संध्याकाळी परिसरातील मोरांचं साद प्रतिसाद नाट्य कानावर पडतं. दरम्यान माझ्या पुढाकाराने आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार पंतप्रधानांच्या कोरोना निधीला देण्याचा ठराव केला. ही आपली खारीची मदत. काहीतरी केल्याचे समाधान. अल्प का असेना. नाहीतरी मेलो की गेलोच ना. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *