दिवस क्र. ६ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
२8 मार्च २०२०

कुठेही जात येत नाही. काल मुष्किलीने खान मार्केट पर्यंत गेलो. आणि काही घरच्या अत्यावश्यक गोष्टींची खरेदी केली. पोलीस ध्वनिक्षेपकापातून या महामारीतून बचाव करण्यासाठी काय काय उपाय करायचे हे सांगत होते.
इकडे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर आणि बस स्थानकांवरती हजारोंच्या संख्येने लोक धक्काबुक्की करताहेत. त्यांच्या हातात डोक्यावर सामान आहे. बायका पोरांना घेऊन त्यातले असंख्य लोक पायी उत्तर प्रदेश बिहार व मध्य प्रदेश वगैरे राज्यांकडे जायला निघालेत. या दरम्यान दिल्ली प्रशासनाने व अन्य राज्यांच्या प्रशासनाने बसेस पाठवून या लोकांना आपापल्या जिल्ह्यापर्यंत जाण्यासाठीची व्यवस्था सुरु केली आहे. लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्थाही शाळा व सामाजिक संस्थांच्या जागा वापरून करण्यात येत आहे. शांततेच्या काळात प्रशासनावर अशा प्रकारे अभूतपूर्व तणाव आलेला आहे. युद्धातील तणाव हे मुख्यतः सीमेच्या आसपास असतात. आता देशाचा इंच इंच देशवासियांनी लढवायची सीमा झाली आहे.
माझ्या समोरच्या खिडकीतून लोदी गार्डन स्पष्ट दिसते. तिथले कारंजे सुरूच आहे. झाडं वाऱ्यांनी झुलताहेत. स्वच्छ सुंदर ऊन आणि आम्हाला अपरिचित आश्चर्यकारक अशी प्रदूषणरहीत हवा. सुंदर ऊन पण बाहेर पाऊल टाकणे नाही. दररोज संध्याकाळी एकदा घराचे कुंपण ओलांडून दोन मिनिटांसाठी मुख्य रस्त्यापर्यंत जातो. तिथं जणू आपोआप एक अदृश्य कुंपण असल्याचा भास होऊन आम्ही घरी परततो, प्रत्यक्षात एक सुंदर निर्जन दुतर्फा भरगच्च हिरव्या पानांचा शालू लेऊन डोलणाऱ्या अशोकाच्या उंच झाडांनी शोभिवंत असा रस्ता आहे. पण अशा या संकटाच्या वेळी नसलेल्या लक्ष्मणरेखा दिसू लागतात. ‘भय इथले संपत नाही’ असेच काहीसे.
दररोज एखादी विदेशात अडकलेल्या भारतीयांची नवीनच कथा ऐकायला मिळते. काल अभिजित बोरा मॉरिशस वरून बोलत होते. त्यांना तिथून चार्टर विमान मिळालेले आहे. त्यांना भारतात येण्यासाठी आवश्यक परवानगी हवी आहे. माझ्या परीने मी पूर्ण मार्गदर्शन केले.
Leave a Reply