दिवस क्र. ३ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
२५ मार्च २०२०

सगळे बंद. तुरळक वाहतूक. घरी पैसे नाहीत. गाडी काढली. ऑफिसात गेलो. त्या आधी ड्रायव्हर ला घरी यायला सांगितले. तो नानक पुरातून बस घेणार. मग कार्यालयाच्या पार्किंगमधून गाडी घेऊन येणार. मग मी बँकेत जाणार. मी त्याला पुन्हा फोन करून येऊ नको म्हणून सांगितलं. मी स्वतःच गेलो माझी गाडी घेऊन. ऑफिसातून चेकबुक घेतले. बँकेतून पैसे काढले. परतीच्या प्रवासात दोन ठिकाणी पोलिसांनी अडवले. मी माझे ओळखपत्र दाखवले. ‘ऑफिसला गेलो होतो घरी परत चाललोय’ असं सांगितलं. ‘कौनसा ऑफिस?’ वगैरे चौकशी करून त्याने मला सोडून दिले.
संध्याकाळी पंतप्रधानांनी भाषण दिलं राष्ट्राला उद्देशून. पहिल्यांदा मनापासून व मुद्देसूद बोलले. आवाजातला नाटकीपणा नैसर्गिक वाटला. कृत्रिम नव्हे. २१ दिवसांची संचारबंदी घोषित. अन्य देशांमध्ये काय चाललंय, विशेषज्ञ काय म्हणतात, २२ तारखेची संचारबंदी यशस्वी झाली व आता तीन आठवडे बंद पाळल्याने काय चाललंय सगळं छान मांडलं त्यांनी. आवश्यक कडक उपाय योजना किती आवश्यक आहे हे सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत सांगितले.
मी ही घरातच आहे. काही गोष्टी नव्याने सुरु केल्या. लेखनातील नियमितता वाढवली. बागेतच चालणे सुरु ठेवले. म्हणजे आमच्या अंगणात. संध्याकाळी ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ ही अमेरिकेतील मालिका पाहायला सुरुवात केली. तीन भाग पाहिले. सत्ता माणसाला किती निर्दय उद्दाम बनवते आणि लोकशाहीत महत्वाकांक्षी लोक वर येण्यासाठी काय करू शकतात या बरोबरच व्यक्तिगत जीवन किती वेगळे होते त्याचे ताणतणावही इथं या मालिकेत दिसतात. या प्रक्रियेत दुर्बलाला चिरडणे हा नैसर्गिक व अनुषंगिक परिणाम. पण खेद दुःख किंवा चिंता नाही. उलट शोकांकिकांचे भांडवल करण्याची कला ही अवगत असावी लागते सत्तापिपासू लोकांना.
Leave a Reply