दिवस क्र. २ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे
२४ मार्च २०२०

वाहतूक थोडीफार सुरूच आहे. बागेतही एखादी व्यक्ती फिरताना दिसत आहे. जनतेने गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.
आमचा माळी पवन, शेजारच्या सरकारी वसाहतीतील एका जिन्या खाली राहतो. अतिशय कर्तव्य दक्ष, मेहनती, शिस्तप्रिय, शांत व सोज्वळ. झाडांवर बागेवर फुलांवर प्रेम करणारा विशीतला पवन. कोरोनाच्या विस्तारामुळे आम्हाला त्याची काळजी वाटतेय. प्रत्येकाने दोन आठवडे घरी राहून विलगीकरण करावे हा संदेश प्रधानमंत्री मुख्यमंत्री व सक्षम अधिकाऱ्यांनी दिला आहे. आमच्या बागेत आठवड्यातील सहा दिवस तो दोन – तीन तास काम करतो. कोरोनामुळे आम्हाला वाटत होते की त्याने आता रोज येऊ नये. आज मी त्याला एका महिन्याचा अतिरिक्त पगार दिला व म्हणालो ‘पवन हे तुझ्या खर्चासाठी. आता तू सहा दिवस येण्याऐवजी आठवड्यातून फक्त एकदा येत जा. फार फार तर दोनदा? पावनने पैसे घेतले – माझ्याकडे बघून निरागसपणे म्हणाला, ‘मी जवळच राहतो. मला दररोज येण्यात काहीच अडचण नाही! मी त्याच्या या प्रस्तावाला नकार दिला पण तो आग्रही होता. शेवटी तडजोड म्हणून म्हणाला ‘मी एका दिवसाआड येत जाईन.’ आम्हाला ते मान्य करावे लागले. तो बागेत काम करायला गेला.
मी विचार करत होतो पवन कशासाठी कामावर येऊ इच्छितो. आता तर १४४ कलम दिल्लीत जाहीर झाले आहे. जिन्याखाली तो आणि त्याचे वडील राहतात. तिथे जागा कमी आहे म्हणून? की दुसरे काहीच करायला नाही म्हणून? बागेचे त्याला प्रेम तर आहेच पण त्यापलीकडे एक माणूस म्हणून पवन चोवीस कॅरेटचे सोने आहे. अल्पशा पगारात गरिबीत राहून अशा या साथीच्या रोगाच्या काळात पवन हे माणुसकीचे विलोभनीय उदाहरण आहे.
Leave a Reply