दिवस क्र. १४ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

५ एप्रिल २०२०

सध्या कोविदशी संबंधित सुविचारांची, संदेशांचे, सूचनांचे पीक आले आहे. एका व्हॉटस अप विचारवंताने ‘मंदिरं आणि मद्यगृहे दोन्ही बंद झाले आहेत. याचा अर्थ स्वर्ग व नरक दोघेही कोरोनाला घाबरतात.’ असं या विचित्र समयाचे वर्णन केले आहे.बालाजीच्या मंदिराला पहिल्यांदा टाळे लागलेले आहे. दुसरीकडं मद्यपी मंडळी आपल्या पेय हक्कासाठी आवाज उठवताहेत. केरळ सरकारने अशा मद्यप्रेमींसाठी ‘विशेष पास’ देण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. गंमत म्हणजे केरळात आतापर्यंत कोरोनाच्या संक्रमणापेक्षा मद्याच्या अभावाने निराश होऊन आत्महत्या केलेल्या मद्यप्रेमींची संख्या अधिक म्हणजे सहा आहे.

न्यूयॉर्क स्थित माझे मित्र रवी बात्रा हे ही कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्याबरोबर पत्नी , मुलगा व कन्या यानाही कोरोनाने ग्रासले आहे.माझ्या मित्रांपैकी ते पहिले ज्यांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यांनी न्यूयॉर्कस्थित चीनच्या संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूतांना उद्देशून एक कडक ट्विट लिहिले. त्यावर राजदूतांनी खेद व्यक्त केला. एकंदरीतच या प्रकरणात चीनच्या भूमिकेबाबत जगभर असंतोष पसरला आहे. अमेरिकेत चीनविरुद्ध नुकसानभरपाईसाठी २० ट्रिलियन डॉलरची केस दाखल करण्यात आली आहे. आज एका व्हिडीओ क्लिप मध्ये एक ऑस्ट्रेलियन तिथल्या चिनी दूतावासासमोर चाबूक घेऊन त्याचे फटके (जमिनीवर )मारत चीनला शिव्या देताना पहिला. भारतामध्येही अतिउत्साही जनतेने चीनच्या मालाविरुद्ध बहिष्कार टाकण्यासाठी व्हाट्सऍप चळवळ सुरु केली आहे. असे बुडबुडे वारंवार येतात. दुसरीकडे बातमी आलीय की भारत चीनमधून व्हेंटिलेटर आयात कारणार. आहे ना गंमत आणि विरोधाभास?

रवी बात्रांच्या पाठोपाठ आज लोकपालच्या एका सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची खबर आहे. कोरोना आधी फक्त चीन पुरता असेल असे वाटत होते. कळायच्या आधी तो युरोपभर पसरला. मग अमेरिकेत. तो पर्यंत आमच्यापर्यंत येईल असं वाटलं नव्हतं. आता इथंही ओळखीच्या लोकांपैकी काहींना झाला आहे. आपल्या महाराष्ट्र्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. दिल्लीतही ५००च्या वर रुग्ण. जगभर १२ लाख.

आमच्या मुलीने सांगितले कि इ-पार्टी नावाचे ॲप आहे. त्यावर तुम्ही जिथे असाल तिथून पार्टीत सामील होऊ शकता. तंत्रज्ञानाचा असाही वापर दिल बहलाने के लिए.

नऊ वाजले. प्रधानमंत्र्यांचा ९ वा ९ मिनिटे ‘दिया जलाईये’चा जल्लोष दिल्लीत सुरु झालाय. फटाके उडताहेत. शंखनिनाद होतोय. सावधान! कोरोना विषाणू सावधान! ज्योतसे ज्योत जलाते चलो.


दिवस क्र. १३ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

४ एप्रिल २०२०

कोविद दैनंदिनी दिवस क्र. १३

कुलूपबंदी. याचा अर्थ ‘घाई नाही.’ सकाळी उठायची घाई नाही. आंघोळीची घाई नाही. नाष्ट्याची घाई नाही. पुस्तक वाचायची घाई नाही. कामाला जाण्याची घाई नाही. जेवणाची घाई नाही. झोपून उठण्याची घाई नाही. रात्री झोपण्याची घाई नाही. 

पंतप्रधानांनी ५ तारखेला रात्री ९ वा. ९ मिनिटे ‘दिवे लावण्या’चा जो सल्ला दिला आहे. त्या सल्ल्याने देशाला खरंच संपूर्ण देशाला चर्चेसाठी नवीन खाद्य मिळालं आहे. व्हॉट्सऍप पासून फेसबुक पर्यंतचे सगळे ओढे नाले नद्या मुख्यतः विरोधी सुराच्या पुराने भरभरून वाहताहेत. अनेकांना शटडाऊन मध्ये काय करावे हा प्रश्न होता तो दोन दिवसांसाठी सुटला. भक्तांनी ती वेळ कशी शास्त्रशुद्ध आहे इथपासून ‘कामदा एकादशी’चा (मी हे नाव पहिल्यांदा ऐकतोय) मुहूर्त त्यांनी कसा साधला आहे असा युक्तिवाद ज्योतिषशास्त्राचा ‘आधार’ घेऊन सांगितलाय. या उलट काही तथाकथित तज्ञांनी अशा प्रकारे एकदम वीजप्रवाह बंद झाला तर वीजव्यवस्थेवर ग्रीड कोसळण्यापासून ते विद्युतकेंद्रे कशी अडचणीत येतील इथपर्यंत अनेक आडाखे दिले आहेत. पण महत्वाचे म्हणजे अनेकांनी प्रधानमंत्र्यांनी स्थलांतरित मजूर, उद्योगधंद्यांवरील विपरीत परिणाम, पुरवठा साखळीत येणाऱ्या अडचणी व अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या दुरावस्थेबद्दल अजिबात न बोलता कुठल्यातरी अशास्त्रीय व अनावश्यक विषयावर वेळ घालवल्याबद्दल दुःख खंत व संताप व्यक्त केला आहे. 

पण दोन सकारात्मक बातम्यांनी माझे मन वेधून घेतले. केरळमध्ये ९२ वर्षीय पती आणि ८४ वर्षाच्या पत्नी अशा जोडप्याने कोरोना संक्रमणावर मात केली आहे. दुसरी अजूनही उत्साहवर्धक बातमी म्हणजे सध्याच्या या शटडाऊनमुळे हवा अगदी स्फटिकासारखी स्वच्छ झाली आहे. याचा परिणाम म्हणून जालंदरहून २०० कि.मी. पेक्षा दूर असलेल्या हिमालयाची रांग शहरातून स्पष्ट दिसू लागली आहे.  

याहूनही अधिक ‘प्रेममय’ वार्ता डेन्मार्क व जर्मनी यांच्या सीमेवरून आली आहे. जर्मनी आणि डेन्मार्कची सरहद्द सध्या बंद आहे. इंगा राझमुसेन (८५ वर्षे) आणि तिचा मित्र कार्स्टन हॅन्सन (८८ वर्षे) या जोडप्याचे प्रेम दररोज सीमेवर बहरते. इंगा स्वीडनची आणि कार्स्टन जर्मनीचा. तिथे ते गप्पा मारतात, एकत्र (सीमेच्या आपल्या बाजूला बसून) जेवण करतात, फ्लास्कमधली कॉफी आणि जील कोम (Geele Kom) हे तिथले लोकप्रिय मद्य पीत ‘चिअर्स टू लव’ म्हणून प्याल्यांचा आवाज करतात. प्रेमाला कोणतेही बंधन, सरहद्द किंवा लॉकडाऊन अमान्य आहे हेच सिद्ध करतात. 

दिवस क्र. १२ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

३ एप्रिल २०२०

कोविदसारखी आपत्ती जेव्हा येते तेव्हा समाजातले सर्वोत्कृष्ट व समाजातले सगळ्यात निकृष्ट दोहोंचे दर्शन होते. आयुष्य बहुआयामी असते आणि सतत आपल्या सूक्ष्म आणि विशाल घटनांमधून स्वतःच्या तपशिलांचे दर्शन घडवते. 

एका बाजूला गरिबांना आणि भिकाऱ्यांना जेवण व अन्नधान्य देणारे पोलीस दिसले. दुसरीकडे जमावबंदी तोडणाऱ्यांना पोलीस ‘निर्दय’पणे चोपताना दिसले. तिसरीकडे इंदूरमध्ये व अन्यत्र पोलिसांना बदडून काढणारे लोक दिसले. एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून योग्य अशा संरक्षक कवचाशिवाय काम करणारे स्वास्थ्य कर्मचारी डॉक्टर व नर्सेस दिसले. दुसरीकडे डॉक्टरांना पळवून लावणारे लोकही दिसले. एकीकडे विदेशात फसलेल्या भारतीयांना खास विमाने पाठवून भारताने मायदेशी आणले हे चित्र तर दुसरीकडे विलगीकरणाचा सल्ला न जुमानता विमानतळावरून थेट घरी जाऊन दोन दिवसांनी तपासणीसाठी जाणारा आय एस अधिकाऱ्याचा कोलकात्यातील मुलगा. एकीकडे स्थलांतरित मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी केलेली हजारो बसेसची उपलब्धता दुसरीकडे राज्यांच्या सीमेवर शेकडोच्या संख्येने रोखून ठेवले गेलेले मजूर. धारावीत जशी रोगाची लागण तशी नोएडातील उच्चवर्गीय वसाहतीतही. ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून भारतातील गायिका कनिका कपूर पर्यंत या विषाणूचा प्रवास संपूर्ण जगाला अवाक करून टाकणारा आहे. 

तबलिगी मर्कज मुळे व्हाट्सऍप विद्यापीठात द्वेषपूर्ण पोस्टना ऊत आला आहे. याबाबत जिथे अंधश्रद्धा, अज्ञान, वैज्ञानिक शिक्षणाचा अभाव त्या ठिकाणी धर्म कोणताही असो अशा घटना घडतात. या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनाला जाऊ पाहणाऱ्या कर्नाटकातील एका महिलेचा बंद दरवाजापलीकडच्या पुजाऱ्याबरोबरचा संवाद हा एका व्हिडिओत पाहिला तो लक्षणीय होता. ‘मुसलमान नमाज पढताहेत. मलाही देवाचे दर्शन घेऊ द्या’ असे ती विनवणी पूर्वक म्हणते तेव्हा तो पुजारी उत्तरतो, ‘राजा हाच ईश्वर असतो. शासनाने आदेश दिला. तोच राजा. मंदीर उघडणार नाही.’ ती स्त्री तिथून निघून जाते. अनुशासनाचा हा नमुना सर्वच संस्थांनी आणि व्यक्तींनी पाळणे आवश्यक आहे. हे युद्ध मानवनिर्मित आहे असे म्हणायला जागा आहे पण अंततः हे युद्ध मनुष्य विरुद्ध निसर्ग म्हणून परमेश्वर यांच्यामधले आहे. यातून आपण काही धडा घेणार आहोत का हा प्रश्न आहे. 

दिवस क्र. १२ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

३ एप्रिल २०२०

कोविदसारखी आपत्ती जेव्हा येते तेव्हा समाजातले सर्वोत्कृष्ट व समाजातले सगळ्यात निकृष्ट दोहोंचे दर्शन होते. आयुष्य बहुआयामी असते आणि सतत आपल्या सूक्ष्म आणि विशाल घटनांमधून स्वतःच्या तपशिलांचे दर्शन घडवते. 

एका बाजूला गरिबांना आणि भिकाऱ्यांना जेवण व अन्नधान्य देणारे पोलीस दिसले. दुसरीकडे जमावबंदी तोडणाऱ्यांना पोलीस ‘निर्दय’पणे चोपताना दिसले. तिसरीकडे इंदूरमध्ये व अन्यत्र पोलिसांना बदडून काढणारे लोक दिसले. एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून योग्य अशा संरक्षक कवचाशिवाय काम करणारे स्वास्थ्य कर्मचारी डॉक्टर व नर्सेस दिसले. दुसरीकडे डॉक्टरांना पळवून लावणारे लोकही दिसले. एकीकडे विदेशात फसलेल्या भारतीयांना खास विमाने पाठवून भारताने मायदेशी आणले हे चित्र तर दुसरीकडे विलगीकरणाचा सल्ला न जुमानता विमानतळावरून थेट घरी जाऊन दोन दिवसांनी तपासणीसाठी जाणारा आय एस अधिकाऱ्याचा कोलकात्यातील मुलगा. एकीकडे स्थलांतरित मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी केलेली हजारो बसेसची उपलब्धता दुसरीकडे राज्यांच्या सीमेवर शेकडोच्या संख्येने रोखून ठेवले गेलेले मजूर. धारावीत जशी रोगाची लागण तशी नोएडातील उच्चवर्गीय वसाहतीतही. ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून भारतातील गायिका कनिका कपूर पर्यंत या विषाणूचा प्रवास संपूर्ण जगाला अवाक करून टाकणारा आहे. 

तबलिगी मर्कज मुळे व्हाट्सऍप विद्यापीठात द्वेषपूर्ण पोस्टना ऊत आला आहे. याबाबत जिथे अंधश्रद्धा, अज्ञान, वैज्ञानिक शिक्षणाचा अभाव त्या ठिकाणी धर्म कोणताही असो अशा घटना घडतात. या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनाला जाऊ पाहणाऱ्या कर्नाटकातील एका महिलेचा बंद दरवाजापलीकडच्या पुजाऱ्याबरोबरचा संवाद हा एका व्हिडिओत पाहिला तो लक्षणीय होता. ‘मुसलमान नमाज पढताहेत. मलाही देवाचे दर्शन घेऊ द्या’ असे ती विनवणी पूर्वक म्हणते तेव्हा तो पुजारी उत्तरतो, ‘राजा हाच ईश्वर असतो. शासनाने आदेश दिला. तोच राजा. मंदीर उघडणार नाही.’ ती स्त्री तिथून निघून जाते. अनुशासनाचा हा नमुना सर्वच संस्थांनी आणि व्यक्तींनी पाळणे आवश्यक आहे. हे युद्ध मानवनिर्मित आहे असे म्हणायला जागा आहे पण अंततः हे युद्ध मनुष्य विरुद्ध निसर्ग म्हणून परमेश्वर यांच्यामधले आहे. यातून आपण काही धडा घेणार आहोत का हा प्रश्न आहे.   

दिवस क्र. ११ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

 2 एप्रिल २०२०

पत्नी साधना आणि कन्या पूजा यांच्याबरोबर मला इतका काळ एकत्र राहण्याची संधी पहिल्यांदाच मिळते आहे. सकाळी नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण यांच्याबरोबरच त्यांच्या आधीचा नंतरचा सगळं वेळ आम्ही एकत्र घालवतो. हे पारिवारिक संमेलन आणि सहवाससुख ही कोरोनाची सर्वात सुंदर देणगी आहे. 

अर्थातच चारी बाजूनी भिडणाऱ्या कोरोना संदर्भातील घटना निरर्थकपणे मनाला भिडतात. २००० च्या वर रुग्ण, सामूहिक संक्रमणाची भीती. ६० च्या वर मृत्यू, अनेक डॉक्टरांना लागण, तबलिगी मर्कजमधून देशभर वितरित झालेल्या भाविकांच्या मार्फत होणारा संभाव्य विषाणू प्रसार सगळेच अस्वस्थ करणारे आहे. 

घाणात अडकलेल्या मित्राच्या वतीने केलेल्या निवेदनावर मी सुद्धा स्वाक्षरी केली. पती घाणात अडकलेला, पत्नी व मुलांना मुंबईत कोरोना, एक मुलगी अपंग घरी आहे. तिला पाहणारं कुणी नाही. अशा प्रकारच्या गुंतागुंतीची अनेक उदाहरणे. 

इतरांप्रमाणे मलाही कोरोनाच्या चक्रव्युहातून बाहेर पडावेसे वाटते. पण मला कोरोनापूर्वीचे जग मान्य नाही. मुख्य म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी सामंजस्य असलेलं आर्थिक, सामाजिक, प्रगतीचं एक नवीन मॉडेल उभारणं आवश्यक आहे. नैसर्गिक साधनांचं अनियंत्रित शोषण, ५ टक्के लोकांच्या हाती केन्द्रित झालेली आर्थिक सत्ता, फक्त राष्ट्रीय विकास दर (जिडीपी) आणि दर डोई उत्पन्नात झालेली वाढ यांच्या पायावर उभारलेली आमच्या प्रगतीची इमारत आतून पूर्ण पोखरलेली आहे. एका बाजूला प्राण्याच्या, माशांच्या, पक्ष्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होत आहेत दुसरीकडे आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विषमता आ वासून आमच्याकडे पाहतेय. कोरोनाच्या पश्चात एक नवीन सुरुवात करण्याची संधी संपूर्ण जगाला मिळतेय. कुणी सांगावं कोरोनाच्या प्रादुर्भावामागे निसर्गाचा हाच संदेश असेल. आजकाल माझ्या घरासमोरच्या लोदी गार्डन मधून दिवस रात्र बदकांचा आवाज येतोय, त्यांचा सामूहिक आवाज विहिरीतून पाणी काढताना मोटेचा आवाज व्हायचा तसा आहे. किती वर्षानंतर मोटेची आठवण आली. 

दिवस क्र. १० दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

 १ एप्रिल २०२० 

मला एकांत आवडतो. पण अशा अविच्छिन संपूर्ण एकटेपणाची सवय नाही. आणि इथं मी अपुरा पडतो. सध्या आज तारीख कोणती आणि वार कोणता हे पटकन सांगता येत नाही. जवळच्या किराणा मालाच्या दुकानांना दिलेल्या एका भेटीव्यतिरिक्त गेल्या दहा दिवसात मी बाहेर पडलेलो नाही. शासनाचा आदेश आहे ‘घराबाहेर पडू नका.’ हे बाहेर न पडणे खूप अंतर्मुख करून टाकतंय. पण शिवाय ते तारेच्या आत सापडलेल्या पाखरांसारखं अस्वस्थ उद्विग्न करून टाकतंय. असं वाटतंय पंख ल्यावेत व उडावं. बाहेर पडावं कुंपणाच्या आणि भटकावं. घरच्या आत खाण्यापिण्याच्या गोष्टींचा तुटवडा नाही किंबहुना आमच्या अनावश्यक गतिशील व त्याहून अनावश्यक अशा व्यस्त जीवनात कधी एकदा निवांतपणा मिळेल असा विचार नेहमी करतो. आज मात्र या निवांतपणाला तोंड देताना नाकी नऊ येत आहेत. मला हा दुबळेपणा वाटतो. आम्हीच तयार केलेल्या काहीशा अप्रिय पण अपरिहार्य जीवनशैलीतून उद्भवलेला. 

उंच उडावे तर पंख नाहीत चालावे तर पाय बांधलेत. टीव्ही असो व सेलफोन सगळीकडे रुग्ण, आजार, उपाय, मास्क, व्हेंटिलेटर, मृत्यू, ओसाड रस्ते आणि संभाव्य उपचार. वातावरणातील नकारात्मकता जीव घुसमटून टाकणारी आहे. पण रस्त्यावर पडलेल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो मजुरांची जी दुःखद अवस्था आहे, खाण्याचे राहण्याचे त्यांचे जे हाल आहेत त्या मानाने माझ्या हे एकटेपणाचे दुःख ही सुद्धा एक चैन आहे. कोविद १९ च्या निमित्ताने आमच्या देशातील सामाजिक आर्थिक विषमतेचे एक अतिभयानक चित्र नजरेसमोर आले आहे. जमावबंदी आणि कुलूपबंदीत देशातील बेघर आणि निर्वासित झालेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. काही लोक शेकडो किमी चालून आपल्या गावी व घरी जाण्याचा प्रयत्न करताहेत. काही तात्पुरत्या निवासगृहात तुटपुंज्या सोयीनिशी कोंडले गेले आहेत. राज्यांच्या सीमेवरती आयाबहिणी पोरंबाळं धरतीलाच अंथरूण-पांघरूण मानून प्रतिक्षेच्या कुंपणात कोंडली गेली आहेत. कोरोनाचा विषाणू भयानक आहेच पण लोकशाही असूनही आपण तयार केलेला विषमतेचा भस्मासुर या देशाच्या मूल्यांवरती फार मोठा डाग आहे. त्या पार्श्वभूमीवर माझे एकटेपण हे एक भाबडे वांझ दुःख आहे.

दिवस क्र. ९ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

३१ मार्च २०२० 

जग थबकलंय. पण मन ही थबकलंय. रेल्वे, विमान, मालवाहू ट्रक, बसेस या सर्वांबरोबर कोणत्याही विषयावर दूरगामी विचार करण्याची किंवा नियोजन करण्याची मनःस्थिती नाही. वास्तविक हा टप्पा तात्पुरता आहे आणि याला शेवट आहे हे माहित असूनही असे का वाटते समजत नाही. 

न्यू जर्सीहून किशोर गोरे या मित्राने लिहिले आहे, “खरं सांगायचं तर आमच्या आजूबाजूची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आमच्या घराच्या आसपास पाच-दहा कि.मीच्या परिसरात जवळजवळ पन्नास कोरोना रुग्ण आहेत. न्यूयॉर्क इथून अवघ्या ५० किमी वर आहे जिथं जवळजवळ २५००० जणांना लागण झाली आहे. देशातील ५०% हून अधिक रुग्ण न्यूयॉर्क न्यूजर्सी कनेक्टिकट या तीन राज्यातील असून फक्त आज ५०० लोकांचा मृत्यू झाला. तीन आठवड्यापासून आम्ही घरात बंदिस्त आहोत. आणि आमच्या दोन्ही मुलींना भेटू शकलेलो नाही. अंकिताचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेय पण तिचा पदवीदान समारंभ रद्द झालाय. ती १ जुलै पासून रेसिडन्सी सुरु करणार होती पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती अशा रुग्णांच्या सेवेसाठी लगेच रुजू होण्याचे नियोजन करते आहे.”

अशाच प्रकारचे गंभीर चित्र ऑस्ट्रेलियातील छोट्या फिनिक्स मधून आलेल्या पत्रात प्रतिबिंबित आहे. त्या पोस्टमधली काही वाक्यं, ‘सध्या क्लिनिकमध्ये बाहेरचा आजार आत येऊ नये म्हणून शक्यतो रुग्णाला बाहेरच्या बाहेर निपटवणं चालू आहे. हॉस्पिटलमध्येहीकोणाला घेत नाहीत. अगदीच परिस्थिती बिघडली आणि व्हेंटिलेटर लागणार असेल तरच ऍडमिट करून घेताहेत.” (सौजन्य: आर्याबाग ग्रुप/मंगेश सपकाळ)

मी आणि पत्नी साधनाने आज ठरवले की एक तास कोरोना सोडून इतर विषयांवर बोलू. पाचच मिनिटात आम्हाला नकळत आम्ही पुन्हा कोरोनावर आलो. कुणीतरी गळ्याभोवती कोरोनाचा फास बांधतोय. मग दुसरा विषय कसा सुचणार? बाहेर आत टीव्ही वर व्हॉटसऍप वर फक्त हा ‘व्हायरस’ आहे. आज दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘तबलिग’ संस्थेच्या बेपर्वाईमुळे उद्भवलेल्या रुग्णांबाबत दाहिदिशानी चर्चा सुरु आहे.  

हे घरचि माझे विश्व

Photo by NASA 

खूप दिवस विचार करतेय लिहावं. Microbiology आणि research background असल्याने आणि सतत वाचतेय त्यामुळे अस वाटत की लिहावं पणं दुसरीकडे काही गोष्टी मला रोखत आहेत. पण आज मात्र मी मला जे सांगावे वाटते आहे जे की जनहिताचे आहे ते. लेख लिहिताना पाऊस पडतोय गेले दोन तास. आता या वेळेला पाऊस नसता आला तर खर बर पणं आपल्या हातात नाही ते म्हणून जे आपल्या हातात आहे ते आपण प्रामाणिक पणें करायचं.

माहिती चा प्रसार


असं सतत समोर येतंय की ज्याने लोक घाबरून जातील असे मेसेज देऊ नयेत कारण ते कमकुवत असू शकतात. किंवा त्याने negativity येते. बरोबर आहे पणं थोड आश्चर्य ही वाटत, कारण सध्या आपण न भूतो  न भविष्यती अशा परिस्थितीत आहोत. त्यात पुन्हा कधीही आपल्या वर अशी स्थिती येऊ नये ही प्रार्थना. अशा वेळी तेंव्हा आपण जेवढी माहिती मिळेल तेवढी मिळवायला हवी का नको? 

तर तुमच्या माझ्या वाटण्यावर जगात काय व्हावं अस घडत तर आपल्या सारखे भाग्यवान आपणच. पण तसे नाहीये. संकटात कोण टिकत? तर धीर धरून राहणाराच टिकतो. डार्विन ची जी खंबीर तो टिकला ही थिअरी माहित नाही का आपल्याला? पण सतत हे कानावर येत असल्याने मी थोडी थांबून होते पणं आज मला वाटत मी लिहावं. मी थोडा माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे, अजूनही अजूनही जर आपण काही करू शकलो आणि  स्टेज 3 थोडी थोपवू शकलो तर. मी खर तर त्यावरच फोकस ठेवला आहे.

हा व्हायरस धोकादायक का आहे?

आत्तापर्यंत आपण वाचलं असेलच की तो फार जास्त वेगाने एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमित होतो. म्हणून खर तर तो H1N1 पेक्षा कमी विषारी असला तरी जास्त नुकसान करतो.. अस सांगितल जातंय साधारण 2 टक्के लोक फक्त मृत्युमुखी पडताहेत. मी फक्त म्हणतेय कारण आजमितीला बाकीचे रोग यापेक्षा जास्त मृत्यू घडवून आणतात. भारतातील च उदाहरण घेऊ. भारतात आजही दर वर्षी लोक निव्वळ सध्या फ्लूने  लोक मरतात, TB या रोगाने साधारण 2, 20,000 लोक मृत्युमुखी पडतात दर वर्षी असे आकडे सांगतात. मग आपण असे हवालदिलं होतो का? तर नाही. कारण अनेक आहेत त्यातले एक म्हणजे जरी टीबी एककडून दुसऱ्याकडे संक्रमित होतो तरी तो या प्रमाणत होते नाही. आपण जर सध्या जी स्वच्छता बाळगतो तशी जर आपण कायम ठेवली, तर टी बी आपल्या देशातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. शिवाय टी बी हा सुद्धा खूप केसेस मध्ये बरा होतो. त्यावर उपाय योजना आहेत. फ्लू म्हणल तर तो सुद्धा आपल्या आपण बरा होतो. अस म्हणतात फ्लू आल्यावर तुम्ही डॉक्टर कडे गेलात तर 7 दिवसात बर व्हाल नाही गेलात ते आठवड्यात. थोडक्यात फ्लू हा सेल्फ लीमितींग रोग आहे. अस सांगितल जातंय की जपान मध्ये कोविद19 कमी का आहे कारण एरवीच जपानी लोक खूप स्वच्छता बाळगतात, मास्क बांधतात, शिवाय सतत हात धुतात. तुम्हाला तो द्रष्टा माहित आहे का की ज्याने सर्वप्रथम जगात हात धुण्याच महत्व मेडीसिन मध्ये किती आहे हे समजावून सांगितले. इग्नास सेमेलेविसे त्याच नाव, साल साधारण 1842. पणं त्याला वेडा ठरवला गेला. डॉक्टर्स लोकांनी च त्याच्या थिअरी ल विरोध केला. त्याला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये टाकला आणि शेवटी  तिथेच त्याचा मृत्यू झाला. आज तुम्ही आम्ही आणि मोठे मोठे लोक हात कसे धुवायचे याच प्रशिक्षण घेतोय. असो तर थोडक्यात मुद्दा असा की आजच्या आजारात आपल्याला कशाशी लढायच? तर या व्हायरस च्या इथून तिथे उड्या मारणाच्या स्वभावाशी म्हणून म्हणून घरात रहा, संपर्क टाळा. यात न कळण्या सारखे काही नाही. फक्त प्रामाणिक पणे पाळा. मग मी आत्ता चक्करच मारतो. आम्ही खाली जाऊन गप्पा मारतो हे टाळा. बोला एकमेकांशी पणं फोन वर बोला, झूम वर बोला, आहे ना technology तुमच्या दिमतीला. हे जे छाती दडपवणारे पेशंट चे आकडे येताहेत अमेरिकेतून, यूरोप मधून त्यातून आपण धडा शिकायला नको का? साधा हिशोब आहे जितके कमी लोक संपर्कात येतील पेशंट सोबत तितका कमी पसरेल तो रोग.. आणि आत्ता कोणीही असू शकतो याचा कॅरियर.. यालाच म्हणताहेत रोगाचा चढता आलेख फ्लॅट करायचा, चढता आलेख आडवा करायचा, नंबर कमी करत जायचा.. म्हणून दोस्तांनो घरी रहा, भाजी नाही मिळाली, अगदी चहा नाही मिळाला तरी चालेल पण कृपया आपल्या सरकार ला मदत करा. पोलिसांना पणं किती ताण आहेत. त्यांना हे काम मागे लावू नका जे तुम्हाला सहज करणे शक्य आहे. जगाला मदत करत स्वतःला मदत करायची ही खूप नामी संधी आहे.

कोरोना मुळे मृत्यू आणि घेण्याची काळजी.

 मग तुम्ही म्हणाल पणं मृत्यू किती होताहेत. पुन्हा एकदा सांगते  त्या मानाने मृत्यू कमी आहेत, कशाच्या तर जितक्या लोकांना रोग झालाय त्यांच्या मानाने. ही थोडी आकडेवारी क्लिष्ट होईल पणं इलाज नाही. या निमित्ताने शिकायला मिळाले अस समजू आपण. साधारण 2 टक्के एवढा मृत्यू दर आहे. अस प्राथमिक रित्या दिसत आहे की हे मृत्यू बहुतांशी अशा लोकांमध्ये झाले आहेत ज्यांना काही दुसरा आजार ज्याला को मोरबिदिटी म्हणतात, जसं की जास्त वय किंवा डायबिटीस, किंवा अजून काही सिरियस आजार, जसे सिपिओडी, दुसरा कुठला तरी रोगजन्तु, ब्लड प्रेशर अथवा इतर काही. अशी बाकीची पण पुरेशी कारण मृत्यूला कारणीभूत असू शकतात.  तिथेही लागली प्रत्येक जण नाही मृत्युमुखी पडणार. वार्धक्याचा इफेक्ट प्रत्येकात काय आहे हे बघावा लागेल.इटली मध्ये अनेक मृत्यू हे वयस्कर लोकांमध्ये झाले असे सांगितले जाते पणं बाकीचे फॅक्टर जस की त्या माणसाची इम्मुनिटी, वेळेवर मिळालेली मदत, त्याच आत्मभान आणि धैर्य पणं महत्वाचे आहेत सर्वात. आणि महत्वाचं म्हणजे आपण आपल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण दिला नसेल तर ती जसे की हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस, आपल्याला पूर्ण ताकदीनिशी मदात करू शकतील. म्हणून, म्हणून व्हायरस ला तुमच्या जवळ येण्याचे सर्व मार्ग बंद करा. नुसते मला भीती वाटते म्हणून कधीच आयुष्यात संकट जात नाहीत. ती विचारपूर्वकच लढावी लागतात. जस की मला काही दिवसापूर्वी स्ट्रोंग स्टँड घ्यावा लागला एका मीटिंग संदर्भात, तसच काल काही पालकांना मला सांगाव लागलं, तुम्ही मुलांना खाली आणु नका. तुम्ही जिथे बसलाय तिथे कदाचित तो असेल करोना. सांभाळून आणि घाबरून राहता, तर  नुकसान नाही काही.

कोरोना बारा होऊ शकतो.

आता सर्वात महत्वाची गोष्ट. साधारण 85 टक्के लोकांना या आजारात किरकोळ त्रास होतो. साधारण फ्लू सारखा. हे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या लोक बरे होताहेत. तेंव्हा घाबरु नका. पणं मुद्दा हा आहे की बरे होणार म्हणून आजारी पडावे का? तर नाही, म्हणून काळजी घ्या. टोकाची काळजी घ्या. देशाचा, जगाचा विचार करा. बघा असा विचार करा, पृथ्वी प्रदूषणाच्या विळख्यातून थोडीशी सुटते आहे. ती भरभरून देईल तुम्हाला जर तुम्ही मोकळा श्वास तिला घेऊ दिला तर. या रोगात घाबरून जायचे काहीच कारण नाही. या पेक्षा जास्त probability रस्त्यावर अपघातात  मृत्यू होण्याची असते.

कोरोना ची लस आणि आरोग्य


तर लोकहो आपण जर शास्त्र जाणून घेतले तर खूप सोप्प आहे समजायला.हो खरं आहे की अजून आपल्याला अनेक गोष्टी माहित नाहीत जसे की हा कुठून आला, पणं एक सांगू उगाच काहीतरी कन्स्पीरसी थिअरी त आत्ता अडकू नका. पुढचा प्रश्न,  याला औषध काय ? जगभर प्रयत्न चालू आहेत, नक्कीच काहीतरी उपाय मिळेल तोवर धीर धरा, लस नाही का? अजून नाही पणं होऊ शकेल. पणं तसाही व्हायरस वर प्रभावी लस नाही बनत कारण व्हायरस सारखा mutate होतो, इथे जास्त खोलात जावे लागेल जे की मी आत्ता टाळणार आहे. पणं लस आणि उपाय बनेल नक्कीच बनेल. आता व्हायरसला प्रतिबंध करणारे काही इतरही घटक शरीर तयार करते. इंटरफेरॉन हे प्रोटीन तसेच आहे. त्याचाही उपयोग नक्कीच होईल रुग्णांना जर त्यांनी तन आणि मन टफ ठेवलं.

कोरोना पासून बचावासाठी त्याची माहिती ठेवा.

विस्ताराने परत सांगायचे तर हिम्मत धरून कॅरोना बद्दल वाचा, जेणे करून तुमचे नुकसान कमी होऊ शकते. सत्य आणि तथ्य जाणून घ्या, पुढंचे काही दिवस घराबाहेर पडू नका. कोणी पडत असेल तर प्रसंगी वाईटपणा घेऊन त्यांना अडवा. सगळे मिळून आपल्या जगाला वाचवू. “हे विश्वची माझे घर” म्हणून मग “हे घरची माझे विश्व” म्हणा येते काही आठवडे. व्यवस्थित खाणे, झोपणे, व्यायाम, प्राणायाम, फोन वर गप्पा, गाणी, सिनेमे, जुने फोटो, पुस्तके, लिखाण, आठवणी, कविता, टीव्ही ज्याने मन रमेल ते करा जेणे करुन तुमची स्वतःची इम्मुनिटी व्यवस्थित काम करेल आणि तुमचे आरोग्य नीट राहील. धीर धरा.

“धीर धरी रे धीरापोटी फळे रसाळ गोमटी”. वेळ आलीच तर धीराने सामोरे जा.

 Stay safe। Stay home।Stay informed.

डॉ मधुरा विप्र, PhD 
madhvi125@gmail.com
9822065743
रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर.दिवस क्र. ८ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

३० मार्च २०२०

सामाजिक कार्य

गावी नियमित फोन करणे सुरु आहे. भाऊ, वाहिनी आणि आई आणि आता सुटीवर आलेली शालेय वयातील पुतणीची मुलगी आर्या. आर्या पुण्याला शिकते. कोरोना व्हायरस च्या संदर्भात गावातील अंगणवाडी व आशा कर्मचारी घरोघरी जाऊन बाहेरून कोण आले आहे? त्यांची तब्बेत कशी आहे या गोष्टींची पडताळणी करत आहेत. आर्याची पण चौकशी झाली आणि तिच्या हातावर १४ दिवसांचा विलगीकरणाचा ठप्पा हातावर मारला गेला. 

नामू दादा म्हणाला, ‘कोबीची भाजी काढायला आली आहे पण जमावबंदीमुळे काढणे शक्य नाही. नुकसान अटळ आहे.’ यावर्षी शेतकऱ्यांना पूर व अवकाळी यांचा तडाखा बसलाच होता. आता कोविदचा झटका बसतोय. 

स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतत आहेत. त्यातल्या एका जमावावर रसायन युक्त निर्जंतुकचा फवारा करण्यात आला. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना आपले स्थान न सोडण्याचा आणि त्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्यसरकारांना दिल्या आहेत. या दरम्यान, हजारो कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा,राजस्थान व बिहार या राज्यांनी बसेस ची व्यवस्था केलेली आहे.  दरम्यान अनेक गावांबाहेर स्थानिकांनी रस्ता बंदी केली आहे. बाहेरचे कुणी येता कामा नये मग ते गावकरी का असेनात असा पवित्रा आहे. 

 मी जी दोन गावे दत्तक घेतलीत. त्यापैकी एक आहे शिरोळ तालुक्यातील बस्तवाड. स्थानिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंगारे यांनी एक वेगळाच उपक्रम घेतला.गावकऱ्यांची भाजी थेट कोल्हापुरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवली. आमच्या फौंडेशनने या कठीण काळात चांगले काम सुरु केले आहे. 

 अशीच चांगल्या कामाची बेटं सगळीकडेच तयार होताहेत. विनायक माळी व त्याची पत्नी सार्शा ऊसतोड कामगारांना मदत करत आहेत. पुण्यात मित्र राज देशमुख यांचा जागृती ग्रुप निराधार मजुरांच्या कुटुंबांना धान्याचा पुरवठा करतोय. ही बेटं मला या काळात आशावादी ठेवताहेत. 

दिवस क्र. ७ दैनंदिनी श्री ज्ञानेश्वर मुळे

२९ मार्च २०२०

लोधी उद्यान दिल्ली

काल माझ्या शाळेच्या संस्कृत शिक्षिका मीरा करकरे (सहस्त्रबुद्धे) यांच्याशी बोललो. तब्बेतीची चौकशी. इतर काही गप्पा. कोरोनाच्या निमित्ताने एक नवा संवाद होतोय सर्वांशी. नंतर बाईंचा छोटासा संदेश आला. ‘आज तू आवर्जून चौकशी केलीस आमची, काळजी केली, सूचना ही केल्यास खूप छान वाटलं. केवढा आधारभूत होतो असा दिलासा.’ बाई आणि त्यांचे पती कोल्हापूरला अपार्टमेंटमध्ये राहतात. कुणाची मदत नाही पण ते स्वतःची काळजी घेत आहेत.  कोल्हापुरच्या सायबर कॉलेजचे प्राचार्य कुलकर्णी यांचा मोरोक्कोच्या विमानतळावरील लाउंज मधून फोन आला होता. कुठल्याशा देशाला कामासाठी जाऊन परत येताना मोरोक्को – दुबई मार्गे मुंबई हा प्रवास व त्याचा बोर्डिंग पास ही त्यांच्या हातात होता. दुर्दैवानं मोरोक्कोला येऊन ते लॉकडाऊन मध्ये अडकलेत. विमानतळावरून बाहेर जात येत नाही. त्यांना मधुमेह आहे. दूतावासाची मदत होत आहे. पण त्यांची अवस्था कैद्यासारखीच आहे . 

सक्तीच्या या सुट्टी मुळे अनेक बारीक गोष्टींकडे लक्ष जातंय.  आमच्या अंगणात फुललेले आणि फुलू पाहणारे प्रत्येक फूल मला ओळखते. आंब्याचा मोहर पावसामुळे गळतोय. चाफ्याला अचानक पानं फुटून थंडीत कोरडा ठणठणीत वाटणारा चाफा संवेदनशील वाटतोय. लिंबाच्या छोट्या पिवळ्याशार पानांचा दररोज एक नवा गालिचा तयार होतोय. सूर्यास्ताच्या वेळेस लिंबाच्या झाडाचे दररोज नवे विलोभनीय रूप दिसतंय. कधी नव्हे तितके रात्रीचे आकाश नितळ असल्याने पहिल्यांदा ग्रह व तारे दिसताहेत. पक्ष्यांचे आवाज नेहमी पेक्षा अधिक स्पष्ट ऐकू येताहेत. लोदी उद्यानातील बदकांचा कलकलाट दिवसभर ऐकू येतोय. संध्याकाळी परिसरातील मोरांचं साद प्रतिसाद नाट्य कानावर पडतं. दरम्यान माझ्या पुढाकाराने आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार पंतप्रधानांच्या कोरोना निधीला देण्याचा ठराव केला. ही आपली खारीची मदत. काहीतरी केल्याचे समाधान. अल्प का असेना. नाहीतरी मेलो की गेलोच ना.